सातारा : सहकार चळवळीतील कार्यकर्ते व सेवकांना आधुनिक व प्रभावी प्रशिक्षण मिळावे या उद्देशाने सातारा जिल्ह्यात सहकार प्रशिक्षण सभागृह उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन सोमवार, दि. २० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता अजिंक्य कॉलनी, कॅम्प येथे होणार आहे.
या सभागृहाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष ना. प्रविण दरेकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार नितीनकाका पाटील असणार असून माजी खासदार संजय मंडलीक यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
उद्घाटनानंतर सकाळी ११ वाजता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सहकारी संस्था कार्यकर्त्यांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. ‘सहकार चळवळीसमोरील आव्हाने व उपाययोजना’ या विषयावर सहकार मंत्रालयातील सेवानिवृत्त सहसचिव एस. बी. पाटील आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे समन्वयक रमेश बांडे मार्गदर्शन करणार आहेत.
हा संयुक्त कार्यक्रम महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, सातारा जिल्हा सहकारी बोर्ड, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. याबाबतची माहिती संघाचे संचालक धनंजय शेडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रा. जितेंद्र जगदाळे, संजीव साळुंखे यांच्यासह संचालक मंडळ व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमास राष्ट्रीय मजूर सहकारी संघाचे अध्यक्ष संजीव कुसाळकर, उपाध्यक्ष अर्जुनराव बोरुडे, मानद सचिव रामदास मोरे, ज्येष्ठ संचालक शिवाजीराव नलावडे, उपाध्यक्ष अनिल देसाई, विभागीय सहनिबंधक डॉ. महेश कदम, सहनिबंधक सोनाली रावल ठाकूर, जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक, विशेष लेखापरीक्षक श्रीधर कोल्हापूरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सहकार चळवळीच्या बळकटीसाठी आयोजित या कार्यक्रमास सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष प्रा. जितेंद्र जगदाळे, उपाध्यक्ष संजीव साळुंखे व संचालक मंडळाने केले आहे.