साताऱ्यातील रस्त्यांवर तृतीय पंथियांकडून नाकाबंदी

वाहतूक पोलिसांची चुप्पी; रस्त्याच्या मध्यभागी उभे राहून पैसे उकळणाऱ्यांवर कारवाईची मागणी

by Team Satara Today | published on : 12 November 2025


सातारा : गेल्या काही महिन्यांपासून सातारा शहरातील विविध रस्त्यांवर तृतीयपंथीयांकडून नाकाबंदी केली जात असून रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या नागरिकांसह वाहनचालकांकडून पैसे उकळण्याचा फंडा सुरू केला आहे. याचा सर्वाधिक त्रास सर्वसामान्य महाविद्यालयीन विद्यार्थी- विद्यार्थिनींना होत असून वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांसमोरच अशा घटना घडूनही त्यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे संबंधित तृतीय पंथांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये सातारा शहरांमध्ये तृतीयपंथीयांची संख्या आश्चर्यकारकरीत्या वाढली आहे. सातारा शहरासह परिसरातील उपनगरांमध्ये वास्तव्य करणारे अनेक तृतीयपंथी अर्थर्जनासाठी साताऱ्यात आले आहेत. सातारा शहरातील राजवाडा, अजंठा चौक, बॉम्बे रेस्टॉरंट उड्डाणपूल परिसर, वाढे फाटा उड्डाणपूल परिसर, प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसर, सातारा बसस्थानक परिसरात या तृतीय पंथीयांचा मोठ्या प्रमाणावर वावर सुरू झाला आहे. त्यांनी आता त्यांचा पारंपारिक व्यवसाय सोडून शहरातील रस्त्यांवर उभे राहून पैसे उकळण्याचा नवीन फंडा शोधलेला आहे.

सातारा तालुक्यातील विविध गावातून फार मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी- विद्यार्थिनी शिक्षणासाठी रोज सकाळी बसने सातारा शहरात येत असतात. बस स्थानकामध्ये बसमधून उतरल्यानंतर ते पायी चालत महाविद्यालयाकडे जात असताना सकाळच्या वेळी सेव्हन स्टार इमारतीसमोर रस्त्यावर फार मोठ्या प्रमाणावर तृतीय पंथीयांचे थवे पाहायला मिळतात. त्यातील अनेक तृतीयपंथ संबंधित विद्यार्थी- विद्यार्थिनींकडे पैशाची मागणी करत असताना अनेकदा पाहायला मिळते. विशेष म्हणजे हा प्रकार ज्या राधिका चौकात सुरू असतो त्या ठिकाणी वाहतूक नियमासाठी सातारा शहर वाहतूक शाखेचे दोन पोलीस कर्मचारी तैनाच असतात. त्यांच्यासमोर हा सर्व प्रकार घडत असतो. त्याच परिसरात सकाळच्या वेळी भाजी मंडई भरत असते. रस्त्याच्या कडेला फळ विक्रेत्यांचे गाडेही लावलेले असतात. पैसे उकळणाऱ्या तृतीयपंथीयांना अभय देत वाहतूक पोलीस रस्त्याकडेला फळ विक्री करणाऱ्या गाडे चालकांवरच दादादागिरी करत असताना अनेकदा सातारकरांनी पाहिले आहे. बॉम्बे रेस्टॉरंट उड्डाणपूल, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, जुना आरटीओ चौक परिसरातही रस्त्यावरच तृतीयपंथ नाकेबंदी करत असतात. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरातील चौकात भरस्त्यावर उभा राहून वाहनांना हात करून त्यांच्याकडे पैशाची मागणी केली जात आहे मात्र संबंधितांवर कोणतेही कारवाई होताना दिसत नाही.

गेल्या अनेक महिन्यांपासून साताऱ्यातील रस्त्यांवर उभे राहून अनेक तृतीयपंथी वाहन चालकांकडून पैसे उकळत आहेत. तृतीयपंथीयांच्या या कृत्यामुळे मात्र वाहतूक कोंडी तसेच छोटे-मोठे अपघात होत आहेत. तृतीयपंथांकडून होत असलेल्या सक्तीच्या वसुलीमुळे वादाच्या प्रसंगाबरोबरच छोटे मोठे अपघात होऊ शकतात. कायदा व सुव्यवस्थेला बाधा येऊ शकते ही गोष्ट माहित असतानाही सातारा शहर वाहतुक शाखेच्या पोलिसांनी गांधारीची भूमिका बजावण्यात धन्यता मानली आहे. सातारा शहराला अगोदरच वाहतूक कोंडीचे ग्रहण लागले आहे. अपुरे व निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे शहरातील प्रत्येक रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असताना नाकाबंदी करत तृतीयपंथीय पैसे उकळत असल्यामुळे वाहतूक कोंडीत फार मोठ्या प्रमाणावर भर पडू लागली आहे.

पोलिसांचा नवीन फंडा..

साताऱ्यातील बहुतांश रस्त्यावर तृतीयपंथीय पायी चालत जाणाऱ्या नागरिकांसह वाहन चालकांकडून सक्तीची वसुली करत असताना त्याच रस्त्यावर, परिसरात शहर वाहतूक शाखेचे पोलीसांकडून वाहनचालकांच्या कागदपत्रांची तपासणी करणे, वाहतुकीला अडथळा होत आहे असे विनाकारण भासवत फळ विक्रेते गाडे चालकांकडून दंडाच्या नावाखाली सक्तीने वसूली मोहीम राबवली जात आहे. थोडक्यात काय तर 'तुम जिओ, हमे भी जीने दो' अशी भूमिका वाहतूक पोलिसांनी घेतली असल्यामुळे भविष्यकाळात साताऱ्याच्या रस्त्यावर तृतीय पंथीयांचे थवेच्या थवे पहायला मिळाल्याशिवाय राहणार नाहीत.त्यामुळे वाहतूक पोलिसांनी संबंधित तृतीयपंथीय समज देऊन भविष्यामध्ये रस्त्यावर उभे राहून वाहन चालकांकडून पैसे उकळले जाणार नाहीत याबाबतची कार्यवाही करण्याची गरज आहे.

बांगलादेशी तृतीयपंथीयांचा शोध घेण्याची गरज

मुंबई येथील गोवंडी व मानखुर्द या उपनगरांमध्ये बांगलादेशी तृतीयपंथीयांचा वावर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी शेकडो बांगलादेशी तृतीयपंथांना अटक केली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात अशा प्रकारच्या बांगलादेशी तृतीयपंथीयांचा वावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सातारा पोलिसांनी त्या दृष्टीने तपास करण्याची गरज निर्माण झाली आहे. सातारा शहर व परिसरात वावर असणारे तृतीयपंथीय मूळ महाराष्ट्रातील की, बांगलादेशी आहेत याची खतरजमा करणे गरजेचे आहे. जे तृतीयपंथीय मूळ महाराष्ट्रातील आहेत, त्यांचे शासन स्तरावर पुनर्वसन करून त्यांना रोजगार देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोरेगावमध्ये डंपरचे काम बंद करण्यावरून राडा; सहा जणांवर गुन्हा
पुढील बातमी
ऐन निवडणूकीत इच्छुकांकडून देवाचा धावा

संबंधित बातम्या