गोंदिया : सडक अर्जुनी वनविभागांतर्गत बाराही महिने जंगलात राहून वनसंपदेचं रक्षण करणाऱ्या बारमाही वनमजूरांचे होळीपासून वेतन प्रलंबित आहे. पोळा, गणेशोत्सवही वेतन न मिळाल्याने त्यांच्यासह कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. पगाराविना कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा झाला आहे.
लाडक्या बहिणींना खूश करून दाजींचे मात्र हाल होत आहेत. त्यामुळे मुनगंटीवार साहेब आमच्या पोटापाण्याचे काय? असे म्हणत ताबडतोब प्रलंबित वेतन अदा करण्याची मागणी होत आहे. शासनाचे इमानेइतबारे काम करूनही वेळेवर वेतन होत नसल्याने नाईलाजाने वेतनाअभावी सावकारांकडून कर्ज काढून परिवाराचा उदरनिर्वाह व मुलांचे शिक्षण व आरोग्याच्या समस्या सोडविण्याची वेळ बारमाही वनमजुरांवर आली आहे.
वनमजूरांचा वेतना अभावी दुर्गाष्टमी व दसरा सुद्धा अंधारात जाण्याचे चित्र आहे. शासनामार्फत लाडकी बहीण योजना राबवून लाडक्या बहिंणींना 1500 रूपये प्रतिमहिना देऊन खुश करण्यात येत आहे. मात्र, रात्रदिवस जंगलाचे संरक्षण व गस्त करून जबाबदारी पार पाडत असलेल्या वनमजुरांना होळीपासून वेतनापासून वंचित ठेवले आहे.
शासनाची जबाबदारी राखून ठेवणाऱ्या या बारामाही वनमजूरांना वेतनाअभावी वनमजूर सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत इमानदारीने जंगलाची गस्त करून संरक्षण करणाऱ्या वनमजूराला तुटपुंजे 13 हजार रूपये वेतन मिळते. ते देखील वेळेवर होत नाही. उलट त्याच विभागातील इतर वरिष्ठ अधिकारी कर्मचारी हे वनमजूरावर जंगल सोडून महिन्यात एक दोनदा रस्त्याने व कार्यालयात दिसतात.