आरफळ ग्रामपंचायतीच्या ८ बैठकांना गैरहजर राहणाऱ्या सदस्य अजय पवार यांना अपात्र करा; सुशांत मोरे यांची जिल्हा परिषद अध्यक्षांकडे पुराव्यानिशी तक्रार

by Team Satara Today | published on : 28 September 2026


सातारा : आरफळ ग्रामपंचायतीचे सदस्य अजय रामचंद्र पवार हे डिसेंबर २०२५ ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना सलग गैरहजर राहिले आहेत. ग्रामपंचायतीची परवानगी न घेता बैठकींना गैरहजर राहिल्याचे पुरावे सादर करून, अधिनियमातील कलम ४० नुसार त्यांना सदस्य पदावरून अपात्र ठरवावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षांकडे तक्रारीद्वारे केली आहे.
सातारा तालुक्यातील ‘अधिकाऱ्यांचे गाव’ अशी ओळख असलेल्या आरफळ ग्रामपंचायतीची फेब्रुवारी २०२२ मध्ये थेट सरपंच आणि ९ सदस्य पदांसाठी अटीतटीची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत अजय रामचंद्र पवार यांची सदस्य म्हणून निवड झाली. नागरिकांनी मोठ्या विश्वासाने सोपविलेली जबाबदारी पार पाडण्याऐवजी ते ग्रामपंचायतीच्या मासिक सभांपासून दूर राहिल्याचे जनमाहिती अधिकारातून प्राप्त कागदोपत्रावरुन उघड झाले आहे.
दि. २२ डिसेंबर २०२५ रोजीच्या मासिक सभेपासून दि.२४ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेपर्यंतच्या  सलग बैठकींना ते गैरहजेरी असल्याचे पुरावे तक्रार अर्जासोबत सादर केले असल्याचे सुशांत मोरे यांनी सांगितले.
ग्रामपंचायत सदस्य हे केवळ पद भूषविण्यासाठी नसून गावाच्या विकासाच्या निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्यासाठी निवडले जातात. त्यामुळे बैठकींना सातत्याने गैरहजर राहणे हा गंभीर प्रशासकीय आणि लोकप्रतिनिधित्वाचा विषय असल्याचे  सुशांत मोरे यांनी म्हटले आहे.
तक्रार अर्जासोबत सादर केलेल्या पुराव्यांची सखोल पडताळणी करून, संबंधित कायदेशीर तरतुदीनुसार दोष सिद्ध झाल्यास अजय पवार यांच्यावर तत्काळ अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी  सुशांत मोरे यांनी  जिल्हा परिषद अध्यक्षांकडे केली आहे.
ग्रामपंचायत सदस्य जबाबदारी विसरले की कारवाई
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नागरिक सरपंच आणि सदस्यांना पाच वर्षांसाठी विश्वासाने निवडून देतात. सलग ६ मासिक सभांना गैरहजर राहणाऱ्या सरपंच , सदस्यां विरोधात कायदेशीर तरतुदीनुसार अपात्रेची कारवाई होते. सातारा जिल्ह्यातील कोणत्याही ग्रामपंचायतीत सरपंच , सदस्य हे कर्तव्यात कसूर करीत असल्यास त्याबाबतची माहिती, उपलब्ध पुरावे जनहक्क समितीकडे (संपर्क : ९९२१४ ५९०८०) द्यावेत. संबंधित प्रकरणांमध्ये कायदेशीर प्रक्रियेनुसार पाठपुरावा करण्यासाठी समिती सहकार्य करेल, असे सामाजिक कार्यकर्ते शिवाजी जाधव यांनी सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खंडाळा तालुक्यात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू; शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी करून घेण्याचे तहसीलदार रविराज जाधव यांचे आवाहन
पुढील बातमी
जिल्हा बँक निवडणुकीत अर्जविक्रीला वेग; 357 अर्जांची विक्री, दोन दिवसांत 34 उमेदवारांचे 36 नामनिर्देशन अर्ज दाखल

संबंधित बातम्या