सातारा : दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज थकीत असल्याने कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहण्याची चिंता असलेल्या शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २0२६ अंतर्गत एकरकमी समझोता योजनेतील सातारा जिल्ह्यातील ५ हजार ५७८ पात्र शेतकऱ्यांची यादी २० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या हिश्श्याची रक्कम बँकेत भरल्यानंतर दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार हलका होण्याची आशा निर्माण झाली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक यांनी दिली.
राज्य शासनाने २ जून २०२६ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार ही कर्जमुक्ती योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये कर्जमाफी, एकरकमी समझोता आणि प्रोत्साहनपर लाभ अशा तीन घटकांचा समावेश आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात कर्जमाफी घटकाची अंमलबजावणी करण्यात आली. याअंतर्गत २४ जुलै, ११ सप्टेंबर, १२ ऑक्टोबर आणि २२ ऑक्टोबर २०२६ रोजी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यांवर आतापर्यंत २५२.८८ कोटी रुपयांची कर्जमाफी जमा करण्यात आली आहे.
दरम्यान, अद्याप आधार प्रमाणीकरण पूर्ण न केलेल्या ४ हजार ६६० शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एकरकमी समझोता योजना राबविण्यात येत आहे. या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याची ठरलेली रक्कम बँकेत भरल्यानंतर उर्वरित पात्र रकमेतून दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. यासाठी बँकांकडील कर्जखात्यांची माहिती संगणकीय पद्धतीने संकलित करून ५ हजार ५७८ पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे.
कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी विलंब न करता संबंधित बँक शाखेशी संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक यांनी केले आहे.
कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांसाठी एकरकमी समझोता योजनेची ही घोषणा दिलासादायक ठरणार असून, पात्र लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी तत्परता दाखवणे गरजेचे आहे.
ग्रामपंचायत, बँक शाखांमध्ये लाभार्थ्यांची यादी
या योजनेतील लाभार्थ्यांची जिल्हानिहाय यादी परिशिष्ट 'अ' आणि बँकनिहाय यादी परिशिष्ट 'ब' मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित याद्या ग्रामपंचायती, बँकांच्या शाखा आणि विकास संस्थांच्या कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी आपले नाव, कर्जखात्याचा तपशील आणि योजनेतील पात्रता तपासून घ्यावी.
दोन लाखांवरील थकबाकीदार शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मार्ग मोकळा; जिल्हा उपनिबंधक संजय सुद्रिक यांची पत्रकाद्वारे माहिती
by Team Satara Today | published on : 21 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा