सातारा : सातारा शहरात ऐन गणेशोत्सवाची धामधूम आणि गणेश भक्तांची गर्दी असताना येथील मोती चौकामध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्याने टप्प्याटप्प्याने 18 जणांचा चावा घेतला. यामुळे शहरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. हे कुत्रे मोती चौक, राधिका चौक, कोटेश्वर मंदिर मार्गे शाहूपुरी कडून करंजे परिसराकडे गेल्याची माहिती आहे. या कुत्र्याच्या शोधार्थ मुकादामांचे 25 जणांचे पथक रवाना करण्यात आले आहे.
सातारा शहरात गणेशोत्सवाच्या दरम्यान मोकाट कुत्र्यांचे विघ्न निर्माण झाल्याने गणेश भक्त धास्तावले आहेत. सातारा पालिकेने साडेसहा लाखाची कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची निविदा काढली आहे. सातार्यातील एका संस्थेला हा ठेका देण्यात आला असून या संस्थेने आत्तापर्यंत अडीचशे कुत्र्याचे निर्बिजीकरण केल्याची माहिती आहे. अर्थात कुत्री कधी पकडली गेली, त्याचे निर्बिजीकरण कधी झाले ? हा सगळा गुलदस्त्यातला विषय आहे. असे असताना मंगळवारी दुपारनंतर मोती चौकात एका पिसाळलेल्या कुत्रीने लाटकर पेढेवाले दुकानाच्या परिसरात एकाचा चावा घेतला. ही कुत्री भुरकट रंगाची असून तिच्या पाठीवर पांढर्या रंगाचा चट्टा आहे, अशी माहिती पालिकेचे आरोग्य निरीक्षक प्रकाश राठोड यांनी दिली आहे.
हे चावासत्र काल दि. 10 रोजी संध्याकाळी साडेसहा ते रात्री उशिरा साडेदहापर्यंत सुरू होते. गर्दीमुळे बिथरलेल्या कुत्रीने सरळ राधिका रोड वरून कोटेश्वर मंदिर मार्गे शाहूपुरी आणि तेथून पुढे करंजे परिसराचा रस्ता धरल्याचे समोर येत आहे. या दरम्यान तिने 17 ते 18 जणांना चावा घेतल्याची माहिती आहे. या सर्वांना लसीकरणासाठी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भटक्या कुत्र्यांचे चावा सत्र सुरू झाल्याची माहिती कळताच पालिकेचा आरोग्य विभाग सक्रिय झाला आहे. मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या सूचनेप्रमाणे आरोग्य विभाग प्रमुख प्रकाश राठोड यांनी 25 मुकादामांचे पथक तयार करून प्रत्येक भागात या कुत्रीचा शोध घेण्यासाठी सूचना दिल्या आहेत. सातारकरांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
पिसाळलेल्या कुत्र्याचा अठरा जणांना चावा
पालिकेच्या 25 मुकादमांचे पथक कुत्र्याच्या शोधात
by Team Satara Today | published on : 11 September 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा