मसूर : मसूर-उंब्रज जाणाऱ्या रस्त्यावर काल पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कांबिरवाडी (ता. कराड) हद्दीत बंद अवस्थेतील डंपरला पाठीमागून मोटारसायकलीने धडक दिली. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला. नानासाहेब यशवंत साळुंखे (वय ५२, रा. वाण्याचीवाडी, ता. कराड) असे मृताचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, की कांबिरवाडी हद्दीत गणपती मंदिरसमोर रस्त्यावर डंपर (एमएच ४० सीएम ४८३९) रस्त्यात बंद पडलेल्या अवस्थेत उभार होता. दरम्यान, मसूर ते उंब्रज रस्त्याने नानासाहेब साळुंखे हे मोटारसायकलवरून (एमएच ५० के २७२४) जात होते. डंपरला पाठीमागील बाजूस धडकून त्याचा अपघात झाला. यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मसूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार राजेंद्र माने करीत आहेत.