हल्ली केसांच्या समस्या खूप वाढल्या आहेत. बहुतांश जणांना केस गळणे, केस पातळ होणे, केसांना वाढ नसणे, केसांना फाटे फुटणे, कमी वयात केस पांढरे होणे, असे अनेक त्रास होतात. या समस्या कमी करण्यासाठी काही घरगुती उपायही निश्चितच आहेत. असाच एक केसांचं गळणं कमी करून केस छान दाट, लांब होण्यासाठी काय उपाय करता येऊ शकतो, ते पाहूयाहा उपाय करण्यासाठी आपल्याला जास्वंदाची पानं आणि फुलं लागणार आहेत.
केसांची वाढ चांगली होण्यासाठी उपाय
केसांची वाढ भराभर होण्यासाठी जास्वंदाच्या पानांचा आणि फुलांचा कसा वापर करता येऊ शकतो, याविषयीची माहिती सांगणारा व्हिडिओ healthyhabits648 या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
हा उपाय करण्यासाठी जास्वंदाची ४ ते ५ फुुलं आणि ८ ते १० पानं घ्या. हा उपाय करण्यासाठी गावरान जास्वंद निवडावा.
जास्वंदाची पानं आणि फुलं स्वच्छ धुवून घ्या. यानंतर ती एका भांड्यात घाला आणि त्या भांड्यामध्ये पानं- फुलं बुडतील एवढं पाणी घाला. आता हाताने पानं आणि फुलं कुस्करून घ्या. हळूहळू जसंजसं तुम्ही ती फुलं हाताने चोळाल तसं तसं त्यातून फेस आणि चिकट पदार्थ बाहेर येईल.
पाणी पुर्णपणे चिकट होऊन एखाद्या जेलसारखं झाल्यानंतर ते गाळून घ्या. गाळून घेतलेल्या पाण्यामध्ये ॲलोव्हेरा जेल आणि थोडं तेल घाला. हे मिश्रण एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरा.
आठवड्यातून एकदा हे पाणी तुमच्या केसांच्या मुळाशी लावा. त्यानंतर साधारण अर्ध्या तासाने नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका. हा उपाय काही दिवस नियमितपणे केल्यास अगदी महिना भरातच केसांची खूप चांगली वाढ होत असल्याचं दिसून येईल. शिवाय केस गळण्याचं प्रमाणही बरंच कमी होईल.
हे पाणी तुमच्या केसांना लावल्यानंतर कोणतंही दुसरं कंडिशनर लावण्याची गरज नाही. कारण घरी तयार केलेल्या या जास्वंदाच्या जेलमुळे केस खूप मऊ आणि चमकदार होतात.