पेरलेत झाडे तोडताना नियमांना 'फाटा'

पीडब्ल्यूडी ची लिलाव प्रक्रिया चुकीची; शासकीय नुकसान

by Team Satara Today | published on : 03 December 2024


सातारा : कराड तालुक्यातील पेरले गावच्या हद्दीत रस्त्याच्या कामासाठी झाडे तोडण्याची लिलाव प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागाने राबविली. मात्र, ही प्रक्रिया करताना नियमांना 'फाटा' दिला असून, शासनाचा महसूल बुडविला आहे. वन विभागाची परवानगी न घेता झाडांची विल्हेवाट लावली आहे. त्याबाबत चौकशी करण्याची मागणी पेरले येथील अमोल वीर यांनी जिल्हाधिकारी, पीडब्ल्यूडीचे अधीक्षक अभियंत्यांकडे केली आहे.

निवेदनात नमूद केले आहे की, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कराड उत्तर कार्यालयाकडून पेरले ते हेळगाव दरम्यान रस्ता रुंदीकरण, डांबीकरणाचे काम सुरु आहे. त्यासाठी पेरले ग्रामपंचायतीच्या हद्दीतील झाडे तोडण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबविली होती. मात्र, त्यामध्ये अनियमितता असून, पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी नियमांची पायमल्ली केली आहे.

या रस्त्यावरील सिल्व्हर ओकच्या झाडांची तोंडणी करण्यासाठी ही लिलाव प्रक्रिया राबविली. मात्र, त्याची कोणत्याही दैनिकांत प्रसिध्दी दिली नाही. पेरले ग्रामपंचायतीच्या हद्दीत ही झाडे असतानाही पेरले ग्रामपंचायतीला नोटीस दिली नाही. तसेच हणबरवाडी ग्रामपंचायतीमध्ये नोटीस न जाहीर करता केवळ सही व शिक्के घेतले आहेत. यादववाडी येथे प्रशासक असतानाही सरपंचाचे सही, शिक्के घेतले आहेत. नियमांचे उल्लंघन करुन ही प्रक्रिया राबविली आहे.

वन विभागाकडून ११९ झाडांचे मूल्यांकन केले होते. काही झाडे तोडण्यास परवानगी दिली नव्हती. तरीही संबंधित ठेकेदारांनी सर्वच झाडे तोडली आहेत. तसेच वन विभागाने वाहतूक परवाना दिला नसतानाही तोडलेल्या झाडांची विल्हेवाट लावली आहे. पीडब्ल्यूडीचे अधिकारी, ठेकेदारांनी संगनमत करुन चुकीच्या प्रकारे ही प्रक्रिया राबविली आहे. त्यामुळे शासनाचा महसूल बुडाला आहे. परवानगी नसतानाही वाहतूक केली आहे. मूल्यांकन नसलेली झाडे तोडली आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन, दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही अमोल वीर यांनी केली आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बंद टपऱ्यांच्या विरोधात सातारा पालिकेची मोहीम तीव्र
पुढील बातमी
सातारा स्थानिक गुन्हे शाखेची पिस्टलची शतकी कारवाई

संबंधित बातम्या