एसटीच्या तब्बल 8 हजार बसगाड्या भंगारात

by Team Satara Today | published on : 26 April 2025


मुंबई : सर्वात स्वस्त आणि किफायतशीर प्रवास म्हणून एसटी बसकडे पाहिले जाते. त्यातच अनेक योजना सुरु असल्याने प्रवासी संख्याही वाढताना दिसत आहे. महिला सन्मान आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवास योजनांमुळे एसटीची दिवसाची प्रवासी संख्या 55 लाखांपर्यंत पोहोचली आहे. तर दुसरीकडे महामंडळाच्या ताफ्यातील तब्बल 8 हजार बस प्रवासी वाहतुकीतून बाद म्हणजेच भंगारात जाणार आहेत.

सध्याच्या घडीला गाड्या बंद पडण्याचे प्रमाण जास्त असल्याने वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. त्यामुळे वाढत्या प्रवासी संख्येला सामावून घेण्यासाठी जादा बस उपलब्ध करुन देण्याचे धनुष्य महामंडळाला पेलावे लागणार आहे. महामंडळाच्या ताफ्यात एकूण 14 हजार एसटी आहेत. त्यापैकी दररोज सरासरी 12 हजार 800 एसटी रस्त्यावर धावतात. म्हणजेच सुमारे एक हजार ते बाराशे एसटी कोणत्या न कोणत्या कारणामुळे आगारात किंवा विभागीय कार्यशाळेमध्ये बंद अवस्थेत उभ्या असतात.

दरम्यान, विविध सवलती, शाळा-महाविद्यालये सुरू झाल्याने एसटीला गर्दी होत आहे. परंतु गाड्यांची संख्या कमी असल्याने प्रवाशांना नाईलाजास्तव खासगी वाहनातून प्रवास करावा लागतो. प्रवासी संख्येच्या तुलनेत एसटीची संख्या कमी आहेत.

महामंडळाच्या ताफ्यातील सुमारे ६ हजार बस या ७ वर्षापेक्षा कमी आयुर्मान असलेल्या आहेत. या सहा हजारांपैकी ५ हजार गाड्या एलएनजीमध्ये तर १ हजार गाड्या सीएनजीमध्ये रुपांतरित होणार आहेत. उरलेल्या ८ हजार बस या ८ ते १५ वर्ष आयुर्मानातील आहेत. या गाड्या जशा नवीन गाड्या ताफ्यात दाखल होतील, त्याप्रमाणे भंगारात काढण्यात येणार आहे. म्हणजेच महामंडळाची गाड्या भंगारात काढण्याचे नियोजन नवीन गाड्या येण्यावर अवलंबून आहे.

प्रवासी वाहन हे १४ वर्षापर्यंत प्रवासी वाहतुकीसाठी वापरणे योग्य असते. 15 वर्षानंतर सदर वाहन हे प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यास योग्य समजले जाते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दहावी-बारावीचा निकाल 15 मेपर्यंत जाहीर होणार
पुढील बातमी
वृद्ध शेतकर्‍याचा उष्माघाताने मृत्यू

संबंधित बातम्या