मुंबई : मराठी सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. सुलभा देशपांडे यांची धाकटी बहिण आणि ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा साखरदांडे यांचं मुंबईतल्या राहत्या निधन झाले आहे. त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे, त्या ९४ वर्षांच्या होत्या. प्रेमा साखरदांडे यांनी मुंबईतल्या माहिमच्या राहत्या घरी गुरुवारी रात्री १० वाजता अखेरचा श्वास घेतला. प्रेमा यांच्या पार्थिवावर रात्री उशिरा दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात त्यांच्या मुली होत्या. दरम्यान, प्रेमा साखरदांडे यांच्या निधनामुळे मराठी इंडस्ट्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी प्रेमा साखरदांडे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
प्रेमा साखरदांडे यांनी मराठी नाटक, चित्रपट, मालिका आणि जाहीरातींमध्ये काम केले आहे. ८० आणि ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये प्रेमा साखरदांडे यांची गणना केली जाते. बालपणापासून घरातच वेगवेगळ्या कलेचे वातावरण असल्यामुळे त्यांच्या घरात फिल्म इंडस्ट्रीतील दिग्गज लोकांची मांदियाळी होती. खरंतर, प्रेमा साखरदांडे ह्या ध्वनीमुद्रक वसंतराव कामेरकर यांच्या कन्या होत्या. त्यामुळे घरामध्ये बालपणापासूनच त्यांचा कलेशी घनिष्ठ संबंध होता. खरंतर प्रेमा साखरदांडे यांना दहा भावंडे होती, त्यांच्यातील काहींचे अभिनय क्षेत्रात मोठे योगदान आहे. ज्योत्स्ना कार्येकर, सुलभा देशपांडे आणि आशा दंडवते या त्यांच्या बहिणी अभिनयक्षेत्रात कार्यरत होत्या.
मुंबईच्या ‘शारदा सदन’ शाळेतून मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झालेल्या प्रेमा साखरदांडे यांनी ‘शालेय रंगभूमी’ हे पुस्तक लिहिलं आहे. बंधू बापू, अशोक, विश्वनाथ, मुकुंद यांनी रंगभूमी, चित्रपट, आणि टेलिव्हिजन सीरियल क्षेत्रात काम केलं आहे. भगिनी कुमुद या गायिका आहेत. त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये गाण्याचे कार्यक्रम केले होते. अशोक कामेरकरांनी अमेरिकेत दुर्गा झाली गौरी या नाटकाचे प्रयोग केले. तसंच आविष्कार व चंद्रशालेच्या संस्थापकांपैकी एक, चंद्रशालेच्या संचालक, ‘चले जाव’ चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्या, शिक्षिका, असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या साखरदांडे यांनी चित्रपट, टेलिव्हिजन सीरियलमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. त्यांनी स्पेशल २६, द इम्पॉसिबल मर्डर, सावित्री बानो, आजी तेंडुलकर, मनन, माझे मन तुझे झाले, बेट, फुल ३ धमाल या चित्रपटांत काम केले होते. त्यांनी प्रपंच मालिकेत काम केले होते. वृद्धापकाळात त्या अभिनय क्षेत्रापासून दुरावल्या होत्या.