रयत संघटनेच्या भविष्यासाठी राष्ट्रवादी प्रवेशाचा निर्णय

by Team Satara Today | published on : 13 March 2025


कराड : सध्याची बदललेली राजकीय परिस्थिती विचारात घेऊन मला रयत संघटनेच्या भविष्यासाठी निर्णय घेणे गरजेचे होते. त्यामुळे उंडाळकर काकांच्या सोबत काम करणारी ज्येष्ठ मंडळी आणि रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अ‍ॅड.उदयसिंह पाटील -उंडाळकर यांनी कराड येथे पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, लवकरच राष्ट्रवादी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होईल, तो ही भव्य असेल असेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी कोयना बँकेस भेट दिली. यावेळी उदयसिंह पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर शिक्कामोर्तब झाले. यावेळी ना.मकरंद पाटील, आ.अमोल मिटकरी, कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, तसेच महानंदाचे संचालक वसंतराव जगदाळे, कोयना दूध संघाचे माजी चेअरमन संपतराव इंगवले, ख.वि. संघाचे माजी चेअरमन हणमंतराव चव्हाण, आप्पासाहेब गरूड, धनाजी काटकर, मोहनराव माने, निवास निकम, कोयना बँकेचे चेअरमन रोहित पाटील, व्हा.चेअरमन विजय मुठेकर, ख.वि.संघाचे चेअरमन अनिल मोहिते, व्हा. चेअरमन जे.डी. मोरे, माजी जि.प. सदस्य प्रदीप पाटील, कोयना दूध संघाचे चेअरमन लक्ष्मण देसाई, व्हा.चेअरमन शिवाजीराव जाधव, बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील, संचालक नितीन ढापरे, दीपक पिसाळ, पं.स.चे माजी उपसभापती रमेश देशमुख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी रयत संघटनेच्या पदाधिकार्‍यांशी संवाद साधला.

बैठकीनंतर उदयसिंह पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली, ते म्हणाले, राजकारण हे प्रवाही आहे. बदलत्या परिस्थितीनुसार आपण बदललो नाही तर संपून जाऊ. त्यामुळे उंडाळकर काकांच्या विचारांसोबत जी मंडळी रयत संघटनेशी हयातभर प्रामाणिक राहिली त्यांच्याशी चर्चा करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. रयत संघटना टिकली पाहिजे, वाढली पाहिजे हे महत्वाचे आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीचा विचार करून कोंडी फुटणे महत्वाचे होते. त्यामुळे आम्ही सर्वांनी एकमुखी हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय माझा एकट्याचा नाही. मी म्हणजे संघटना नव्हे. संघटनेच्या भल्यासाठी आणि संघटना मजबूत करण्यासाठी हा निर्णय महत्वाचा होता.

उंडाळकर काका आणि लक्ष्मणराव पाटील यांची मैत्री जिल्ह्याला माहिती आहे. हे नाते जपत ना.मकरंद पाटील यांनी राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाचा प्रस्ताव ठेवला. त्यांच्या मध्यस्थीने अजितदादा यांच्यासोबत बैठक झाली. त्यांनी रयत संघटनेला ताकद देण्याबरोबर पाठिशी राहणार असल्याचा शब्द दिला आहे. काँग्रेस पदाधिकार्‍यांसोबत चर्चा झाली का, या प्रश्नावर उदयसिंह पाटील म्हणाले, काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांना याची कल्पना दिली होती. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन त्यांनाही माहिती दिली. भूमिका स्पष्ट केली. काँग्रेस पक्ष किंवा नेते यांच्याबाबत कोणतीही नाराजी नाही. किंवा नाराजीतून हा निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले.

रयत संघटनेचा मेळावा लवकरच घेणार असून ना.अजित पवार यांची तारीख मिळाल्यानंतर राष्ट्रवादी पक्षप्रवेशाचा मोठा कार्यक्रम होईल. यानंतर पक्ष जी जबाबदारी देईल, पक्षाची जी भूमिका असेल त्या प्रमाणे रयत संघटना पूर्ण ताकदीने काम करेल, असेही उदयसिंह पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महिला सक्षमीकरण अत्यंत गरजेचे : पृथ्वीराज चव्हाण
पुढील बातमी
धरणग्रस्तांकडून कराडमध्ये ठिय्या आंदोलन

संबंधित बातम्या