पवनचक्क्यांमधील तांब्याच्या तारांची चोरी उघड; चारजण ताब्यात

तवेरा वाहनासह 3.29 लाखांचा मुद्देमाल जप्त; वावदरे आणि चाळकेवाडीतील चोरीचे गुन्हे उघड

by Team Satara Today | published on : 17 October 2026


सातारा : पवनचक्क्यांच्या केबलमधील तांब्याच्या तारांची चोरी करून विक्री करण्याचा प्रकार सातारा स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून 73 किलो तांब्याच्या तारा आणि चोरीसाठी वापरलेले तवेरा वाहन असा एकूण 3 लाख 29 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे वावदरे आणि चाळकेवाडी परिसरातील पवनचक्क्यांच्या केबल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलीस अधीक्षक निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी मालमत्तेविरुद्धच्या गंभीर गुन्ह्यांचा तपास करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक विश्‍वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी यांच्या पथकाने तपास सुरू केला.
15 ऑक्टोबर रोजी जकातवाडी हद्दीतील बोगदा ते डबेवाडी रस्त्यावर तवेरा वाहनातून चोरीच्या तांब्याच्या तारा विक्रीसाठी आणल्या जाणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून राखाडी रंगाच्या तवेरा वाहनाची तपासणी केली. त्यावेळी वाहनात सुमारे 73 किलो तांब्याच्या तारा आढळून आल्या.
या प्रकरणी शहाजी नथुराम शिर्के, धिरज भार्गव जाधव, अजित विठ्ठल जाधव आणि धर्मेंद्र गोविंद केरेकर या चौघांना ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीत जुलै ते ऑगस्ट 2026 दरम्यान वावदरे आणि चाळकेवाडी परिसरातील पवनचक्क्यांच्या केबल चोरून त्यातील तांबे काढल्याची माहिती समोर आली. सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेले गुन्हे या कारवाईत उघडकीस आले. या कामगिरीबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी पथकाचे अभिनंदन केले.
या कारवाईत पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्‍वजीत घोडके, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे, सपोनि अभिजीत यादव, रोहीत फार्णे, पो.उ.नि  चंद्रकांत पुजारी, पारितोष दातीर, सफौ अतिप घाडगे, राजु मुलाणी, पोहवा विजय कांबळे, संजय शिर्के, संतोष सपकाळ, लैलेश फडतरे, सचिन साळुंखे, लक्ष्मण जगधने, शरद बेबले, प्रविण फडतरे, सनी आवटे, सुजित भोसले, अजय जाधव, अमित झेंडे, प्रमोद सावंत, राजू कांबळे, अमित माने, शिवाजी भिसे, अरूण पाटील, अमित सपकाळ, अवि चव्हाण, ओंकार यादव, मोहन पवार, स्वप्नील शिंदे, किरण जगताप, स्वप्नील कुंभार, पृथ्वीराज जाधव, विशाल पवार, रोहीत निकम, इरफान मुलाणी, महेश निर्मळ महीला पोलीस अंमलदार शंकुतला सणस, अधिका वीर यांनी सहभाग घेतला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बसप्रवासात व्यापार्‍याकडील दागिन्यांची चोरी; तब्बल 17 लाखांचे दागिने चोरीस
पुढील बातमी
वेतनश्रेणी सुधारण्यासाठी सेवानिवृत्त न्यायिक कर्मचार्‍यांचे सातार्‍यात धरणे आंदोलन

संबंधित बातम्या