सातारा : सातारा जिल्ह्यात सुमारे 257 जनावरांना लंपीची बाधा झाली असून, 31 जनावरांचा मृत्यू झाला आहे, तर बाधित जनावरांवर पशुसंवर्धन विभागामार्फत औषधोपचार करण्यात येत आहेत. जिल्हा प्रशासनाकडून लसीकरण, उपचार व विलगीकरण यासह विविध उपाययोजना राबवण्यात येत आहे. बाधित जनावरांची संख्या कमी करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग अलर्ट झाला आहे.
सातारा जिल्ह्यात 712 बाधित जनावरांपैकी 424 जनावरे पशुसंवर्धन विभागाच्या उपचारानंतर बरी झाली आहेत. तर 31 जनावरांचा मृत्यू झाला आहे. सध्या 257 जनावरे लंपीने बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पशुसंवर्धन विभागाकडून युध्दपातळीवर उपाययोजना राबवल्या जात आहेत. लंपी हा विषाणूजन्य आजार प्रामुख्याने गायी आणि म्हैशींना होतो. जो डास माशाद्वारे पसरतो. या आजारात जनावरांच्या त्वचेवर गाठी, ताप आणि दुधाचे उत्पादन कमी होणे अशी लक्षणे दिसतात. ज्या-ज्या ठिकाणी बाधित जनावरे सापडली आहेत त्या गावात लसीकरण करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार पशुसंवर्धन विभागाकडून लंपी नियंत्रणासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. यामध्ये बाधित क्षेत्रात जैवसुरक्षा उपाय, जनावरांचे विलगीकरण आणि लसीकरणावर भर दिला जात आहे. शेतकर्यांना आपल्या जनावरांमध्ये लंपीची लक्षणे आढळल्यास तातडीने नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखन्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार यांनी केले आहे.