सातारा : छत्रपती शाहू क्रीडा संकुलात सुरु असलेल्या सोळा वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत आज प्रोफेशनल क्रिकेट अकॅडमीच्या सम्यक सबनीसने झळकावलेल्या झंजावती शतकाच्या जोरावर या संघाने कराडच्या ओंकार चिवटे संघावर 101 धावानी दणदणीत विजय मिळवला.
सातारा नगर परिषद, टी सी सी स्पोर्ट्स फाउंडेशन प्रोफेशनल क्रिकेट क्लब यांच्या वतीने आयोजित सातारा नगर परिषद प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत सम्यक सबनीसने 52 चेंडूत नाबाद 108 धावा केल्या. त्याने 15 चौकार, एक षटकार मारला. सोहम सुतारने 35 चेंडूत 4 चौकार मारून 41 धावा केल्या. या संघाने 20 षटकात दोन बाद 206 धावा केल्या. कराड संघाने 20षटकात 6बाद 105धावा केल्या. आदित्य पाटील याने 38 धावा केल्या. प्रोफेशनल क्लबच्या मनोमय भुर्के याने 4 षटकात 9धावा देऊन 3 विकेट मिळवल्या. सम्यक सबनीस याला काशिनाथ राव स्मृति सामनावीर पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार शरद महाजनी यांच्या हस्ते देण्यात आला.