डॉल्बी चालकांनो ध्वनी मर्यादेचे पालन करा, अन्यथा कारवाई होणार

लेझर लाईटला जिल्ह्यात पूर्णपणे बंदी : पालकमंत्री शंभूराज देसाई

by Team Satara Today | published on : 08 August 2025


सातारा : ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने मर्यादा घालून दिलेल्या आहेत. या मर्यादेचे डॉल्बी चालकांनी गणेशोत्सव कालावधीत तंतोतंत पालन करावे. जे डॉल्बी चालक ध्वनी मर्यादेचे पालन करणार नाहीत, अशांवर कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात गणेशात्सव 2025 च्या तयारीचा आढावा पालकमंत्री देसाई यांनी घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह सर्व तहसीलदार, नगर पालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
लेझर लाईटला जिल्ह्यात पूर्णपणे बंदी घालावी, असे सांगून पालकमंत्री देसाई म्हणाले, लेझर लाईटमुळे डोळ्यांना इजा होण्याची दाट शक्यता आहे. कुठल्याही सार्वजनिक गणेश मंडळाने लेझर लाईटचा वापर केल्यास त्यांच्यावर कारवाई करावी. गौरी विसर्जनानंतर महिला मोठ्या प्रमाणात गणपती पाहण्यासाठी बाहेर पडतात. छेडछाड किंवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पेट्रोलिंगचे प्रमाण वाढवावे.
विसर्जन मिरवणुकीच्या वेळी कोणत्याही प्रकारचा तंटा निर्माण होणार नाही यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी. गणेशोत्सव काळात नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रशासनाने गणेश उत्सवाचे चांगले नियोजन केले असून यंदाचा गणेशोत्सव सुखात, आनंदात व उत्साहात पार पाडूया, असेही आवाहन पालकमंत्री देसाई यांनी केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
20 ऑगस्टपर्यंत शस्त्र व जमावबंदी
पुढील बातमी
गझल हा समजून सादर करण्याचा गायन प्रकार

संबंधित बातम्या