मलकापुरात युनिक उड्डाणपुलाखाली स्लिपरोडवर पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहतूक बंद; ठिकठिकाणी नाल्याची कामे अपुरी ठेवल्यामुळे कंत्राटदाराबद्दल संताप

by Team Satara Today | published on : 08 July 2026


कराड  : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणात नाल्याची कामे अपूर्ण असल्यामुळे अनेक ठिकाणी नाले तुंबले आहेत. त्यामुळे कोल्हापूर नाक्याजवळ युनिक उड्डाणपुलाखाली पूर्वेकडील स्लिपरोडवर गुडघाभर पाणी साचले आहे. स्लिपरोडवर पावसाचे पाणी साचल्यामुळे या परिसरातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. ठिकठिकाणी नाल्याची कामे अपुरी ठेवल्यामुळे कंत्राटदाराबद्दल संताप व्यक्त होत आहे.

शेंद्रे ते कागल या पट्ट्यात तीन वर्षांपासून महामार्ग सहापदरीकरणाचे काम सुरु आहे. सुरुवातीला गतीने सुरू असलेल्या कामाची गती गेली वर्षभरात मंदावली आहे. मलकापूर शहरात पावसाच्या पाण्यासह सांडपाण्याची व्यवस्था म्हणून महामार्ग व उपमार्गाच्या मध्ये दोन्ही बाजूला आणि दोन्ही उपमार्गालगत आरसीसी नाल्यांची व्यवस्था केलेली होती. सहापदरीकरणाच्या कामात महामार्गालगतचे नाले ठिकठिकाणी खोदून ठेवले आहेत, तर काही ठिकाणी नवीन नाले बनवले आहेत.

नाल्याची सलग कामे होत नसल्याने पाण्याचे प्रवाह बंद झाले आहेत. याचा विपरीत परिणाम होऊन काही ठिकाणी उपमार्गांवर पाणी साचून तलाव्याचे स्वरूप प्राप्त होत आहे. या साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. कोल्हापूरनाका ते नांदलापूर परिसरातील नाल्याची कामे ठिकठिकाणी अर्धवट ठेवल्यामुळे नाले तुंबले आहेत.

काही ठिकाणी पावसाचे पाणी उपमार्गावर साचून तलाव्याचे स्वरूप प्राप्त होत आहे. तर ठिकठिकाणी नाले खोदून तसेच ठेवल्याने पाणी रस्त्यावर येत आहे. त्याचपद्धतीने कोल्हापूर नाक्यावर नाला पुढे मार्गस्त नसल्याने उड्डाणपुलाखाली पूर्वेकडील स्लिप रोडवरच गुडघाभर पाणी साचले आहे. स्लिपरोडवर पावसाचे पाणी साचल्यामुळे या परिसरातील काही अंतर वाहतूक बंद करण्यात आली आहे.

फुटलेली झाकणे धोकादायक

मलकापूर शहरात महामार्गाच्या दोन्ही उपमार्गालगतच्या आरसीसी गटरला फुटपाथ बनवण्यात आले आहे. आरसीसी गटरवर टाकलेली झाकणे रुंदीकरणाच्या कामात अवजड वाहनांमुळे अनेक ठिकाणी फुटली आहेत. ही फुटलेली झाकणेही बदलणे गरजेचे होते. ते बदलली नसल्याने धोकादायक बनली आहेत.

पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईकडे दुर्लक्ष

पावसाळ्यात महामार्ग व उपमार्गाकडेच्या नाल्यातील घाणीमुळे नाले तुंबले जातात. नाल्यातील पावसाचे पाणी नागरी वस्तीत घुसू नये म्हणून महामार्ग देखभाल विभाग दरवर्षी नालेसफाई करते. यावर्षी मात्र या कामांकडे दुर्लक्ष झाले असून, खबरदारीचा उपाय म्हणून नाले सफाईचे काम युद्धपातळीवर होणे गरजेचे आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शिवतीर्थ विद्रुपीकरणाविरोधात सामाजिक सुशांत मोरे यांचे रस्त्यावर ठिय्या मारून आंदोलन; शिवतीर्थाचे पावित्र्य आणि सौंदर्य अबाधित ठेवावे, अन्यथा तीव्र आंदोलन करू
पुढील बातमी
मुसळधार पावसामुळे महाबळेश्वरातील पर्यटनस्थळांवर प्रवेशबंदी; आंबेनळी घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद

संबंधित बातम्या