सातारा : कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा द्वितीय दीक्षांत समारंभ सोमवार, दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता ज्ञानदत्त मिरवणूक व मुख्य समारंभस्थळी आयोजित करण्यात आला आहे. या दीक्षांत समारंभासाठी पद्मश्री प्रा. (डॉ.) जी. डी. यादव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
दीक्षांत समारंभाची सुरुवात ज्ञानदंड मिरवणुकीने होणार असून ही मिरवणूक छत्रपती शिवाजी कॉलेजच्या प्रशासकीय कार्यालयापासून सुरू होऊन मुख्य कार्यक्रमस्थळी पोहोचणार आहे. या मिरवणुकीत विद्यापीठाच्या विविध परिषदेचे सदस्य, नियामक मंडळ, अभ्यास मंडळांचे अध्यक्ष, अधिकारी व मान्यवर सहभागी होणार आहेत.
या समारंभात विद्यापीठातील विविध घटक महाविद्यालयांतील गुणवंत विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, पदके व प्रमाणपत्रे प्रदान केली जाणार आहेत. तसेच संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पीएच.डी. विद्यार्थ्यांनाही गौरविण्यात येणार आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाची स्थापना २७ ऑक्टोबर २०२१ रोजी झाली असून अल्प कालावधीत विद्यापीठाने शैक्षणिक, संशोधन व कौशल्य विकासाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. विविध पदवी, पदव्युत्तर व संशोधन अभ्यासक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विद्यापीठाचा भर आहे.
या दीक्षांत समारंभास विद्यापीठाचे कुलगुरू, कुलसचिव, विविध समित्यांचे सदस्य, प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.