सातारा : भैरवगड, ता. जि. सातारा येथील भूस्खलनग्रस्त नागरिकांचे सासपडे येथे सुरक्षित, नियोजनबद्ध आणि कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री श्री. मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात संयुक्त बैठक पार पडली. भूस्खलनग्रस्त नागरिकांना सुरक्षित निवारा देण्यासाठी शासन कटिबद्ध असून संबंधित अधिकार्यांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी याप्रसंगी केल्या.
भूस्खलनग्रस्त नागरिकांना सुरक्षित निवारा तसेच आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडा व संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने आवश्यक कार्यवाही करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. पुनर्वसनाची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि मूलभूत सुविधांनी परिपूर्ण निवास उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना दिलासा देतानाच त्यांचे सुरक्षित आणि सन्मानपूर्वक पुनर्वसन व्हावे, यासाठी शासनाच्या सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
आपत्तीग्रस्त नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत, त्यांना सुरक्षित निवारा आणि आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मंत्रीमहोदयांनी यावेळी दिली. .बैठकीला मंत्री भरतशेठ गोगावले, आमदार हिरामण खोसकर, आमदार शेखर निकम, आमदार मनोज घोरपडे, आमदार शंकर मांडकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.