सातारा : देवी चौक, सातारा येथे मिरवणुकीदरम्यान डॉल्बीचा कर्णकर्कश आवाज, बीम लाईट व एलईडी स्क्रीनद्वारे लोकांना त्रास दिल्याप्रकरणी चौघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 10 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 8.20 वाजता घडला. रजनीकांत चंद्रकांत नागे (वय 41, रा. मल्हार पेठ, सातारा), धीरज रमेश महाडिक (रा. कला-वाणिज्य कॉलेजजवळ, सातारा), दीपक राजेंद्र जगताप (रा. इंद्रायणी नगर, भोसरी, पुणे), हर्षल राजाराम शिंदे (रा. पाटखळ, ता. सातारा), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
यांच्याविरुद्ध सरकारतर्फे फिर्याद दाखल करण्यात आली आहे. फिर्यादी अमोल मानसिंग साळुंखे (वय 40, नेमणूक – शाहूपुरी पोलीस ठाणे) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टर (क्रमांक MH-11 BA-7096) चालक हर्षल राजाराम शिंदे, रजनी साऊंडचे मालक रजनीकांत चंद्रकांत नागे यांनी ट्रॉलीवर लोखंडी अँगल लावून मोठ्या प्रमाणात साऊंड सिस्टिम बसवली. डॉल्बीचा प्रचंड आवाज काढून मिरवणूक काढण्यात आली.
ट्रॉलीवर धीरज रमेश महाडिक व दीपक राजेंद्र जगताप यांनी बीम लाईट व एलईडी स्क्रीन लावून उपस्थितांच्या डोळ्यांना त्रास होईल अशा प्रकारे प्रकाश टाकला. यामुळे मानवी जीवितास उपद्रव झाला तसेच रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांना अडथळा निर्माण झाला.
तसेच पोलिसांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करत ट्रॅक्टर ट्रॉलीमागील जनरेटरचा टेम्पो (MH-11 AL-0226) थांबवण्यास सांगूनही विनापरवाना पळवून नेण्यात आला.
या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोउपनि. जगदाळे करत आहेत.
डॉल्बी व बीम लाईट प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल
by Team Satara Today | published on : 11 August 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा