सातारा : काँग्रेस पक्षाचा सध्या संक्रमणाचा काळ आहे. या काळात कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे. जे कार्यकर्ते पक्षासाठी वेळ देऊ शकतील असे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी पुढे येऊन काम करणे गरजेचे आह. तरच सातारा जिल्हा काँग्रेस मजबूत होईल, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
सातारा जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीच्या विस्तारित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेशराव जाधव, महिला अध्यक्षा अल्पना यादव, ओबीसी प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, प्रदेश सरचिटणीस उदयदादा पाटील, रणजितसिंह देशमुख, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, अजित पाटील चिखलीकर, युवकचे जिल्हाध्यक्ष अमरजित कांबळे, बाबासाहेब कदम, धनश्री महाडिक, विश्वंभर बाबर, संदीप माने, संजय तडाखे, जगन्नाथ कुंभार, मनोहर शिंदे, महेंद्र बेडके सुर्यवंशी, श्रीनिवास पाटील, अशोकराव पाटील, दत्तात्रय धनावडे, अन्वर पाशा खान, बाबासाहेब माने, सुरेश इंगवले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, जिल्ह्यात काँग्रेस सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे. ज्यांना अडचण असेल त्यांनी मला व्यक्तीश: भेटून काही बाबी असतील मला सांगावीत. राज्यात सत्तेवर असलेले सरकार हे सर्वच बाजूने अपयशी ठरत आहे. मोठा गाजावाजा करून सुरू केलेली लाडकी बहीण योजना कारणे दाखवून बंद करणार आहे. राज्याच्या तिजोरीत खडखडाट झालाय की काय, ते सांगत नाहीत. त्यामुळे या योजनेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे.
स्वागत सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांनी केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेशराव जाधव यांनी केले. यावेळी भानुदास माळी, अजित पाटील चिखलीकर, अल्पना यादव, विश्वंभर बाबर यांनी मनोगत व्यक्त केले.
मोदी, फडणवीस सरकारच्या कारभारावर टीका
नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस सरकारच्या कारभारावर टीका करून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, देशाचा आणि महाराष्ट्राचा कारभार चार गुजराथी चालवत आहेत. राज्यात अंबानी व अदाणी, तर देशात कोण आहेत ते तुम्हाला माहिती आहे. मागील शिंदे सरकारने अदानीला मुंबईतील लाखो कोटी रुपयांची हजारो एकर जमीन कवडीमोल भावाने दिली आहे. राज्यातील लाखो कोटी रुपयाची जमीन देऊन राज्य आज कुठे नेवून ठेवले आहे.