सातारा : पुणे पाठोपाठ आता सातारा, जावली, खंडाळा, कराड, खटाव या शहरामध्ये पाच जीबीएसचे रुग्ण दि. २७ जानेवारीनंतर आढळून आले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. याबाबत जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी शुक्रवारी जिल्हा रुग्णालयास भेट देवून याबाबतचा आढावाही घेतला आहे. दरम्यान, कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच जीबीएसचे पाच रुग्ण आढळून आले आहेत. या आजारांमध्ये हातपायाला अशक्तपणा येणे, प्रतिकारशकती मंदावणे ही सुरुवातीची लक्षणे दिसून येत असली तरी कोणीही घाबरुन जावू नये. सध्या १५ वर्षाखालील तीन तर ६५ वर्षावरील २ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये १ जिल्हा रुग्णालयात, ३ खासगीमध्ये सातारा, १ कराड येथे कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
या सर्व रुग्णांची प्रकृती चांगली असून त्यांच्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. यामध्ये तरुणांची प्रकृती चांगली असल्याने ते यामधून लवकर बरे होत आहेत. तर वयोमानानुसार नागरिकांना यामधून बरे होईला वेळ लागत आहे. तरी ही नागरिकांनी या आजाराची भीती बाळगू नये. तसेच अफवा पसरु नये, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी केले आहे.
दरम्यान, सातारा जिल्ह्यामध्ये जीबीएसच्या रुग्णांवर देखरेख तसेच योग्य उपचार होत आहेत की नाही, हे पाहण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिपे यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय पथक रुग्णांवर उपचार करत आहे. आढळून आलेले जीबीएसचे हे रुग्ण परजिल्ह्यातून आले असावेत, हे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांच्याकडे माहिती घेण्याचे काम सुरु आहे, असेही वैद्यकीय अधिकारी यांनी सांगतिले.
अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये
अचानकपणे हातपायाला येणारा लुळेपणा याबाबत पंधरा वर्षाच्या आतील मुलांच्यामध्ये आमच्या सर्व्हेत यापूर्वीही रुग्ण आढळत असतात. ते योग्य उपचारानंतर लगेच बरे होत आहेत. आताच्या जीबीएस आजाराचे रुग्ण आढळले तर याबाबत जिल्हा रुग्णालयात चांगली औषधेही उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणीही या जीबीएस आजाराच्या नावाने अफवा पसरु नये, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिपे यांनी केले आहे.