कराडमध्ये मध्यरात्री मोबाईल शॉपी फोडली; ३० लाखांचे ११५ हँडसेट लंपास

by Team Satara Today | published on : 23 August 2026


कराड  : कराड शहरातील मोहिते हॉस्पिटल परिसरातील ‘एस. एस. मोबाईल शॉपी’वर मध्यरात्री चौघा चोरट्यांनी डल्ला मारत सुमारे ३० लाख रुपये किमतीचे ११५ मोबाईल संच लंपास केले. या धाडसी चोरीमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणी शॉपीचे मालक सचिन रामचंद्र पाटील यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

​फिर्यादी सचिन पाटील हे शुक्रवारी नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते. दरम्यान, मध्यरात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास एका कारमधून आलेल्या चार चोरट्यांनी दुकानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरा तोडला. त्यानंतर दुकानाचे सेंटर लॉक आणि शटर उचकटून आत प्रवेश केला व काऊंटर डिस्प्लेमधील विविध नामांकित कंपन्यांचे महागडे मोबाईल संच लंपास करून ते पसार झाले. लगतच राहणाऱ्या एका नागरिकाने घटनेची माहिती दिल्यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला.

​घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्यासह डीबी पथक आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी तातडीने भेट दिली. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी दुकानाची पाहणी करून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून संशयितांची हालचाल आणि वापरलेली कार या आधारे तांत्रिक तपास सुरू केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय गोडसे करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हा बँक ठरावांसाठी सत्तेचा गैरवापर; आमदार रोहित पवारांचा भाजपवर घणाघात

संबंधित बातम्या