चारुदत्त बुवा आफळे यांच्या सुश्राव्य कीर्तनाने सातारकर मंत्रमुग्ध

सहस्त्रचंडी याग सोहळ्यात देवीला कुंकूमार्चंन सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती

by Team Satara Today | published on : 08 October 2025


सातारा : येथील श्री पंचपाळी हौद दुर्गा माता मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या सहस्त्रचंदी या ग सोहळ्यात सध्या दररोज 50 हून अधिक ब्राह्मणांच्या उपस्थितीत सुरू असलेले सप्तशती पाठाचे वाचन तसेच देवी मंत्रांनी केले जाणारे हवन याचबरोबर सोहळ्यास सातारकर देवी भक्तांची मोठी उपस्थिती लाभत आहे. याग सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या मंदिर प्रांगणातील देवी अर्चना अर्थात कुंकुमार्चन सोहळ्यास सकाळी आणि संध्याकाळी नियोजित विविध क्षेत्रातील मान्यवर दांपत्य उपस्थित राहून शास्त्रशुद्धपणे देवीमुर्तीला कुमकुम अर्चंन विधी पार पाडत आहेत. या विधीसाठी ओंकार शास्त्री बोडस, दिलीपशास्त्री आफळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे.साताऱ्यात प्रथमच होत असलेल्या या सहस्त्रचंडी याग सोहळ्याची उत्कंठा आणि आनंद अधिकाधिक वृद्धिंगत होत असतानाच अद्यापही तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यास सातारकर भक्तांनी भेट देऊन देवी आशीर्वादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय देशमुख व विश्वस्त पदाधिकारी यांनी केले आहे.

दरम्यान  दुर्गा माता मंदिर ट्रस्टच्या वतीने धार्मिक उपक्रमांबरोबरच लगतच्या समर्थ सदन येथे सुश्राव्य अशी प्रवचन आणि कीर्तनमालाही आयोजित करण्यात आली असून सध्या पुणे येथील सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण चारुदत्तबुवा आफळे यांची सलग तीन दिवस सुश्राव्य कीर्तनाची सुवर्णसंधी सातारकरांना लाभत आहे ही कीर्तने ऐकण्यासाठी सातारकरांची मोठी गर्दी समर्थ सदन येथे होत आहे.

या कीर्तनासाठी आफळे बुवा यांना संगीत साथ संवादिनीवर बाळासाहेब चव्हाण यांची लाभूत असून तबला साथ विश्वनाथ पुरोहित यांची आहे.

बुधवारी सकाळी मंदिर परिसरात ज्येष्ठ सुप्रसिद्ध कीर्तनकार चारुदत्त बुवा आफळे यांनी भेट देऊन सहस्त्रचंद यागाचे दर्शन घेतले .या सोहळ्यात त्यांचा विशेष सहकार्य आणि मार्गदर्शनाबद्दल दुर्गा माता मंदिर ट्रस्टच्या वतीने ओंकार शास्त्री बोडस यांच्या हस्ते शाल श्रीफळ व प्रसाद स्वरूपात भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी धनंजय शास्त्री कुलकर्णी, मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय देशमुख व पदाधिकारी उपस्थित होते. या यज्ञ सोहळ्यासाठी चारुदत्तबुवा आफळे यांचे विशेष मार्गदर्शन व सहकारी लाभले असून संकल्प केला तेव्हापासून  या सोहळ्याला आफळेबुवांनी केलेले अनमोल मार्गदर्शनामुळेच हा सोहळा व्यवस्थित आणि योग्य पद्धतीने नीटनेटके व्यवस्थापनाच्या आधारे संपन्न होत असल्याची माहिती यावेळी धनंजय देशमुख यांनी उपस्थित  सातारकरांना  दिली.

शुक्रवार दि. 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले यांचा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य नागरी सत्कार व समारोपाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे .रविवार दि. 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 4 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून मंगळवार दि. 14 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत कर्करोग तपासणी मोफत शिबिर तसेच विविध आजारांबाबत आरोग्य महा शिबिर आयोजित आयोजन करण्यात आले आहे .बुधवार दि. 15 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत रक्तदान महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .या सहस्त्रचंडी महायज्ञ यांच्या धार्मिक सोहळ्यासाठी राज्याच्या प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सह विविध मान्यवरांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले असून या यज्ञाच्या आयोजनासाठी दुर्गा माता मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय देशमुख, उपाध्यक्ष राजेंद्र साळुंखे, सचिव शिवाजी उर्फ प्रशांत तुपे, उपाध्यक्ष शिवाजी भोसले कोषाध्यक्ष प्रेमचंद पालकर यांचेसह हरीष शेठ, विनायक चिखलगे तसेच सर्व विश्वस्त व कार्यकारणी सदस्य हितचिंतक विशेष परिश्रम घेत  आहेत.

सहस्त्रचंडी महायज्ञ साठी भक्तांकरीता 80 जी कलमानुसार देणगीदारांना इन्कम टॅक्स म्हणजेच आयकर खात्यातून सवलत मिळणार आहे तसेच या महायज्ञा साठी श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह मंडळचे अध्यक्ष सुभाषराव बागल, माजी नगराध्यक्ष अशोकराव मोने, समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी ,प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्रीधर कंग्राळकर,सातारा शिवसेना शहर प्रमुख निलेश मोरे, महेश राजेमहाडिक, चंद्रशेखर ढाणे, प्रकाश बडदरे तसेच सर्व साधक, सनातनी संस्था सातारा यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विविध बँकांमध्ये दावा न केलेल्या ठेवी खातेदारांना परत मिळण्याकरीता बँकांशी संपर्क साधण्याचे आवाहन
पुढील बातमी
काश्मिरमधील गडोल जंगलात लष्काराचे दोन जवान गायब

संबंधित बातम्या