मेढा : शहरात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत आहे. त्याचा त्रास नागरिकांना विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागत आहे. दरम्यान, पिसाळलेल्या कुत्र्याचा चावा घेतल्याच्या घटनांमुळे अनेकांच्या चिंतेत वाढ होत आहे. दरम्यान, काल बाजारपेठेत एका पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल १२ जणांना चावा घेतल्याची घटना समोर आली आहे, तर पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने त्यांचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचे समोर आले आहे. जखमींवर मेढा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.
मेढा शहरातील बाजारपेठेत मागील काही दिवसांपासून पिसाळलेले कुत्रे भटकत होते. मात्र, त्याबद्दल कोणीही काळजी घेतली नाही. दरम्यान, आज येथे फिरणाऱ्या पिसाळलेल्या कुत्र्याने १२ जणांना चावा घेतला, तसेच काहींच्या हातापायाचे लचके तोडले. ज्यामुळे अनेकांच्या हातापायातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होत होता. यावेळी नागरिकांनी कुत्र्याला हुसकावून लावत जखमींना त्या पिसाळलेल्या कुत्र्यापासून वाचवले, तर या घटनेमुळे परिसरात भीती पसरली होती. या हल्ल्यात पाच जण गंभीर, तर सात जण किरकोळ जखमी झाले होते.
जखमींना तत्काळ मेढा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी गंभीर जखमी झालेल्या पाच रुग्णांना उपचारासाठी आंतररुग्ण विभागात दाखल करण्यात आले होते, तर इतर सात रुग्णांना रेबीज प्रतिबंधक लस देऊन तसेच अन्य उपचार करून सोडण्यात आले. कृष्णा चंदर धनावडे (वय ५५, रा. करंजे, सातारा), रवींद्र हरिबा सपकाळ (वय ५७ रा. बामणोली, ता. जावळी) हरीश प्रकाश जंगम (वय १९, रा. मेढा), आश्लेषा बापू परिहार, (वय २५, रा. बिभवी, ता. जावळी) सुशांत यदू देशमुख, (वय ३१, रा. मेढा), बायडाबाई विठ्ठल पवार, (वय ६०, रा. मेढा), सूर्यकांत लक्ष्मण आगलावे (वय ४५, रा. आगलावेवाडी, ता. जावळी), सचिन विजय पंडित (वय ४५, रा. मेढा), प्रफुल्ल गेनू कोंडाळकर (वय ३८, रा. मेळघाट, ता. महाबळेश्वर), राजश्री निकम (वय ३८, रा. मेढा), वसंत सुर्वे (वय ६८, रा. करंदी, ता. जावळी), वनिता पार्टे (वय ३६, रा. गोंदेमाळ, ता. जावळी) अशी जखमींची नावे आहेत.
अचानक झालेल्या या कुत्र्याच्या हल्ल्यामुळे मेढा शहरात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यासाठी नगरपंचायतीने या कुत्र्यांचा योग्य तो बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.