सातारा : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिसांनी २४ ते २६ सप्टेंबर दरम्यान वाहतुकीत मोठे बदल केले आहेत. पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३४ अन्वये ही अधिसूचना जारी केली असून गुरुवार, दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेपासून शनिवार, दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत हे निर्बंध लागू राहतील.
विसर्जन मिरवणुकीदरम्यान भाविकांची गर्दी आणि सुरक्षितता लक्षात घेऊन शहरातील राजपथ परिसरातील कमानी हौद, देवी चौक, मारवाडी चौक ते मोती चौक तसेच कमानी हौद ते शेटे चौक या मार्गांवर दोन्ही बाजूंनी वाहनांना पूर्णपणे प्रवेशबंदी करण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीचा मुख्य मार्ग असलेल्या शेटे चौक, शनिवार चौक, मोती चौक ते राधिका टॉकीज चौक, ऐक्य प्रेस कॉर्नर, बुधवार नाका आणि विसर्जन कृत्रिम तलावाकडे जाणारा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. याशिवाय प्रतापगंज पेठेतील काटदरे मसाले दुकान ते डीसीसी बँक व मोती तळे परिसर आणि शाहूपुरी पोलीस ठाणे ते बुधवार नाका या मार्गावरही वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी समर्थ मंदिर ते चांदणी चौक आणि बोगदा–समर्थ मंदिर–शाहू चौक मार्गावर हलकी व अवजड वाहने तसेच एसटी बसच्या वाहतुकीवर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.
सज्जनगड व कास पठाराकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाहने गोडोली नाका, शिवराज पेट्रोलपंप, खिंडवाडी, शेंद्रे-सोनगाव फाटा आणि बोगदा मार्गे वळविण्यात आली असून, मोळाचा ओढा येथून सातारा शहरात येणारी वाहतूक महानुभाव मठ, करंजे व भूविकास बँक चौक मार्गे शहरात सोडली जाणार आहे. विसर्जन मिरवणूक मार्गावर वाहने उभी करण्यास पूर्ण बंदी घालण्यात आली असून नागरिकांनी तालीम संघ मैदान, कोटेश्वर मैदान किंवा निश्चित केलेल्या पर्यायी पार्किंगच्या जागांचाच वापर करावा लागणार आहे. हे सर्व निर्बंध रुग्णवाहिका, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या आपत्कालीन वाहनांना लागू नसतील. नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळून पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, रस्त्यावर वाहने पार्क करू नयेत आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.
गणेश विसर्जनासाठी सातारा शहरात वाहतुकीत मोठे बदल; तीन दिवस प्रमुख रस्ते बंद, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन
by Team Satara Today | published on : 22 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा