सातारा : 104 वर्षाची अखंडित परंपरा असणारे सातारा शहरातील शनिवार चौकात असणारे जयहिंद व्यायाम मंडळ व मावळा फौंडेशन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु केलेल्या गड किल्ले स्वच्छता मोहीमेंतर्गत शनिवार, दि. 8 नोव्हेंबर रोजी तळ कोकणातील किल्ले सिंधुदुर्ग स्वच्छता मोहिम यशस्वीरित्या पूर्ण केल्याची माहिती जयहिंद व्यायाम मंडळाचे अध्यक्ष प्रदीप वाघमळे, मावळा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी दिली आहे.
गड किल्ले स्वच्छता मोहिमेची माहिती देताना वाघमळे यांनी, जयहिंद व्यायाम मंडळ व मावळा फौंडेशन या दोन्ही संस्थांकडे जमा होणारी देणगी व वर्गणी यापैकी एकही पैसा या मोहीमेसाठी वापरला जात नसून ही स्वच्छता मोहीम दोन्ही संस्थांचे मावळे स्वखर्चातून पार पाडतात. या मोहिमेंतर्गत स्वच्छतेसाठी दुसर्या वर्षी किल्ले सिंधुदुर्गची निवड सर्वानुमते केली. प्रत्यक्षात सिंधुदुर्ग किल्ल्यावर अत्यंत स्वच्छता आढळून आली. याबाबत समाधान व्यक्त करून इतर गड किल्ल्यांवरदेखील सर्व लोकांनी अशाच प्रकारची स्वच्छता राहील याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले. याचबरोबर सातारा येथे होणार्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये जयहिंद व्यायाम मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रीय सहभागी राहतील, अशी ग्वाही दिली.
मावळा फौंडेशनचे विनोद कुलकर्णी यांनी जयहिंद व्यायाम मंडळ व मावळा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने गेल्या वर्षापासून गड किल्ल्यांची स्वच्छता करण्याची मोहीम हाती घेतली आहे. गतवर्षी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथून या मोहिमेस सुरुवात करून यावर्षी किल्ले सिंधुदुर्गची स्वच्छता मोहीम पूर्ण केली. युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील ज्या किल्ल्यांचा समावेश केलेला आहे, त्या किल्ल्यांसह सर्व गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली. मोहिमेसाठी सावकार ट्रॅव्हल्स यांनी अल्प दरात गाडी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.
याप्रसंगी जयहिंद व्यायाम मंडळाचे व मावळा फौंडेशनचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.