परिवर्तन चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते विश्वास फणसे यांचे निधन

by Team Satara Today | published on : 13 May 2025


सातारा : मांडवे येथील परिवर्तनाच्या चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते विश्वास अंतू फणसे यांचे अल्पशः आजाराने सोमवारी दुपारच्या दरम्यान निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 87 होते. त्यांच्या इच्छेनुसार मृत्यूनंतर त्यांचे देहदान करण्यात आले. एलआयसीमधील ब्रँच मॅनेजर अजित फणसे यांचे ते वडील होत.

आंबेडकरी चळवळीत विश्वास फणसे सक्रीय होते. वनविभागातून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी चळवळीसाठी विशेषतः धम्मकार्यासाठी झोकून दिले. संगीताची त्यांना प्रचंड आवड होती. स्वतः पेटी वाजवत असल्याने परिवर्तन गीतांचे कार्यक्रमही ते करत. वय, आजारपण, तसेच ऊन - पाऊस याचा विचार न करता चळवळीतील विविध उपक्रमात ते सहभागी होत असत. मांडवे हे गाव तसे मुख्य रस्त्यापासून दूर. मात्र तरीही सातारला येऊन वेगवेगळ्या सभा, धम्मपरिषदा याच्या आयोजनामध्ये ते पुढाकार घेत असत. चळवळीसाठी जी शक्य होईल ती मदत त्यांच्या परीने करत असत. त्यांच्या कार्याबद्दल सातार्‍यात त्यांचा गौरवही करण्यात आला होता.

काही दिवसांपासून विश्वास फणसे आजारामुळे सातारा येथे दवाखान्यात उपचार घेत होते. प्रकृती सुधारत होती. मात्र अखेर काळाने त्यांच्यावर झडप घातली आणि त्यांची प्रणज्योत मालवली. 

त्यांच्या पश्चात पत्नी कुसुम, मुले महेंद्र व अजित आणि तीन मुली तसेच नातवंडे असा मोठा परिवार आहे. मृत्यूची बातमी कळल्यावर चळवळीतील अनेकांनी मांडवे येथे जावून फणसे कुटुंबियांचे सांत्वन केले. बुधवारी सकाळी पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम मांडवे येथील त्यांच्या निवासस्थानी होणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पालिकेच्या नो हॉकर्स झोनला विक्रेत्यांचा विरोध
पुढील बातमी
सातारा पोलिसांकडून अट्टल मोटरसायकल चोराला अटक

संबंधित बातम्या