सातारा : सातारा शहर वाहतूक शाखेने शहरात नियमभंग करणार्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारत वाहनधारकांना शिस्त लावण्याचे काम सुरु केले आहे. दरम्यान, आज एका मॉडिफाय बुलेटवर धडक कारवाई करत ती ताब्यात घेण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास एक बुलेट आली, जिच्यामध्ये अनेक गंभीर फेरफार करण्यात आले होते. या बुलेटवर नंबर प्लेट पूर्णपणे गायब होती, कर्णकर्कश आवाज काढणारा मॉडिफाय सायलेन्सर बसवण्यात आला होता, दुचाकीची मागील सीट काढण्यात आली होती आणि रात्रीच्या वेळी किंवा चालताना डोळ्यांना तीव्र त्रासदायक ठरणार्या लखलखत्या लाईट्सचा वापर केला जात होता. रस्त्यावरील सुरक्षिततेला बाधा पोहोचवणार्या या सर्व प्रकारांची गंभीर दखल घेत वाहतूक पोलिसांनी संबंधित बुलेट तात्काळ ताब्यात घेतली आणि ती सातारा शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात जमा केली.
तपासादरम्यान या दुचाकीबाबत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली असून, या बुलेटवर यापूर्वीच विविध नियमांतर्गत दहा हजार नऊ रुपयांचा दंड प्रलंबित असल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवार पेठ, सातारा येथील श्रेयस दशरथ जाधव याच्या मालकीची ही बुलेट असल्याचे वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांनी सांगितले असून, दुचाकीत अनधिकृत फेरफार करणे आणि वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणे याप्रकरणी आता संबंधितांवर कायदेशीर व दंडात्मक कारवाईची प्रक्रिया तीव्र करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.
कारवाईमुळे शहरात शिस्त निर्माण होण्यास मदत होईल
शहरातील रस्त्यांवर अलीकडच्या काळात काही तरुणांकडून गाड्यांमध्ये नियमबाह्य बदल करण्याचे प्रमाण वाढले असून, नंबर प्लेटशिवाय वाहने चालवणे, कर्णकर्कश सायलेन्सरद्वारे नागरिकांच्या कर्णकर्कश त्रासात भर पाडणे आणि इतर वाहनचालकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणे यांसारख्या गोष्टी वारंवार घडत आहेत. या पार्श्वभूमीवर सातारा शहर वाहतूक शाखेने घेतलेली ही कठोर भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. अशा प्रकारच्या कारवाईमुळे शहरात शिस्त निर्माण होण्यास मदत होईल आणि नियमभंग करणार्यांना मोठा चाप बसेल, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
सातारा शहर वाहतूक शाखेचा कारवायांचा धडाका सुरुच; नियमभंग करणार्या मॉडिफाय बुलेटवर धडक कारवाई
by Team Satara Today | published on : 27 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा