महाबळेश्वर : ब्रिटिशांच्या नजरेत येऊ नयेत म्हणून विहिरीत लपविलेली ऐतिहासिक व पुरातन शस्त्रे आज क्षेत्र महाबळेश्वर येथील एका कोरड्या विहिरीतून बाहेर काढण्यात आली. त्याची पाहणी करून ती तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्या उपस्थितीत पुरातत्व खात्याच्या ताब्यात देण्यात आली आहेत.
श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील ऐतिहासिक व पुरातन वास्तूंचा अभ्यास करत असताना इतिहास अभ्यासक मयुरेश मोरे (फलटण) व स्थानिक जाणकार राहुल कदम यांना दि. 3 मे 2025 रोजी एका जुन्या विहिरिमध्ये (आड/बावडी) मराठा धोप या प्रकारच्या तलवारीची मूठ व इतर पुरातन वस्तू निदर्शनास आल्या. ऐतिहासिक दृष्ट्या मराठा धोप या पद्धतीच्या तलवारी खूप दुर्मिळ व अमूल्य आहेत. इंडियन आर्म्स क्ट नंतर ब्रिटिशांनी अनेक शस्त्रे जप्त करून नष्ट केली. त्यातून वाचलेली शस्त्रे अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक ठेवा आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगप्रसिध्द जगदंबा व भवानी तलवारी या प्रकारच्या आहेत. मराठा युद्धनीती व शस्त्रांचा अभ्यास करून धोप या तलवारी बनवल्या. या तलवारींसाठी फ्रेंच, पोर्तुगीज या देशातील बनावटीचे पाते वापरत असल्यामुळे यांना फिरंगी देखील म्हणत असत. हे पोलाद उत्कृष्ट दर्जाचे असत. या तलवारींचे दोन, उपप्रकार आहेत. पहिला प्रकार वक्र धोप- याचे पाते टोकाचा पिपळा भाग थोडा वक्र असतो. दुसरा सरळ धोप- याचे पाते सरळ असते. अशा तलवारी घोडदळासाठी वापरल्या जात असत, याची लांबी 4 फूट असत. शत्रूला भोकसण्यासाठी हे शस्त्र वापरले जात.
या फिरंगी पात्यांना मराठ्यांनी युध्दामध्ये जास्त काळ टिकण्यासाठी व हाताला इजा न करणारी मुठ बनवली व याचा समतोल बॅलन्स उत्त्तम केला, अशी माहिती अभ्यासक मयुरेश मोरे यांनी दिली. ही ऐतिहासिक ठेव दुर्मिळ आहे हे लक्षात येताच राहुल कदम यांनी वेळ न दवडता ही माहिती गावातील काही प्रमुख व्यक्तींना दिली. धनेश नाना वाडेकर यांनी यांची कल्पना उपविभागीय अधिकारी वाई राजेंद्र कचरे यांना दिली. तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज संग्रालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे, त्याच्यासोबत महारूद्र तिकुंडे (अध्यक्ष युवाराज्य फाऊडेंशन सातारा), सुभाष गायकवाड, रोहन ढाणे यांची टीम साताराहून श्री क्षेत्र महाबळेश्वरला येऊन महाबळेश्वर ट्रेकर्सच्या साह्याने ट्रेकर्स जयवंत बिरामणे आणि अनिल लांगी यांनी या ऐतिहासिक वस्तू विहिरीतूनवर काढल्या. याप्रसंगी धनेश वाडेकर, प्रशांत कात्रट, निलेश धनावडे, आनंद ढेबे, महेश लांगी, संकेत लांगी हे स्थानिक उपस्थिती होते. अशा ऐतिहासिक वस्तूंच्या माध्यमातून इतिहासाची अनेक दडलेली पाने उघडले जाऊ शकतात, असे मार्गदर्शन अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी केले.