छत्रपती संभाजीनगर " ज्या लोकांनी डॉ. आंबेडकरांचा आयुष्यभर विरोध केला, ज्या लोकांनी गांधींची हत्या केली त्यांनी आम्हाला संविधानावर लेक्चर देऊ नये, असं उत्तर अभिजीत दिपके यांनी अतुल लिमयेंना दिलं. मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अभिजीत दिपके हे नाव मागच्या काही दिवसांपासून देशात चांगलंच चर्चेत आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आहेच. पण त्यांचं आंदोलन यशस्वी झाल्यामुळे ते आता पुढे काय करणार? याचीही चर्चा रंगली आहे. दरम्यान अभिजीत दिपके यांनी संघावर टीका केली आहे.
सरसंघचालक मोहन भागवत हे ६ ऑगस्टला मुंबईत ‘जनरेशन झी’ आणि ‘जनरेशन अल्फा’ च्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. यावरही अभिजीत दिपके यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जेन झी सोबत बोलावं लागेल हे समजलं, ही चांगली गोष्ट आहे. पण तरुण लोकांनी तरुणांसोबत बोलणं जास्त चांगलं होईल. तुम्ही जोपर्यंत तरुण चेहरे पुढे आणणार नाहीत, तोपर्यंत त्याला फार अर्थ नाही. तुम्ही तरुणांशी बोला, त्याला हरकत नाही. पण नवीन चेहरे आणि नवीन लोकांना विशेष करुन शिकलेल्या लोकांना पुढे आणलं तर अधिक चांगले होईल, असं अभिजीत दिपके यांनी म्हटलं आहे.
अतुल लिमये काय म्हणाले होते?
सीजेपीच्या आंदोलनाची एक केस स्टडी म्हणून अभ्यास करण्याची आणि ते डिकोड करण्याची गरज आहे. या आंदोलनाची क्रोनोलॉजी काय, मेथोडोलॉजी, सपोर्ट सिस्टीम काय आणि त्या पाठीमागची विचारधारा कोणती हे समजण्याची गरज आहे. अभिजीत दिपकेंच्या भारत आगमनाला आणि त्यानंतर झालेल्या दिल्लीसह इतर शहरातील आंदोलनाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. २० जून नंतर सुरू झालेल्या ठिय्या आंदोलनाला टप्प्याटप्प्याने वाढता प्रतिसाद मिळाला. या काळात असं काय झालं असावं की या आंदोलनाचा स्वरूप बदलला? कोणती सपोर्ट सिस्टीम दिपकेच्या आंदोलनासोबत जोडली गेली हे शोधण्याची गरज असल्याचं मत अतुल लिमये यांनी व्यक्त केले होतं. तसंच हे आंदोलन संविधान विरोधी असल्याचंही म्हटलं होतं. त्याबाबत विचारलं असता अभिजीत दिपकेंनी भाष्य केलं.
अतुल लिमयेंना अभिजीत दिपकेंनी काय उत्तर दिलं?
ज्या लोकांनी डॉ. आंबेडकरांचा आयुष्यभर विरोध केला, ज्या लोकांनी गांधींची हत्या केली त्यांनी आम्हाला संविधानावर लेक्चर देऊ नये, असं उत्तर अभिजीत दिपके यांनी अतुल लिमयेंना दिलं. मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
E20 आंदोलनाला आमचा पाठिंबा
आम आदमी पक्षाकडून आज ई२० इंधनाच्या विरोधात आंदोलन केले जात आहे. यावर बोलत असताना दिपके म्हणाले की, ई२० विरोधात अनेकजण बोलत आहेत. देशात हा मोठा मुद्दा बनला आहे. अनेकांनी हा मुद्दा उचलला आहे. आमच्याही पेजेसवर ई२० वर बोलण्याबाबत विचारले जात आहे. ई२० बाबत जी आंदोलने होतील, त्याला आमचा पाठिंबा आहे. हा कोणत्याही एका पक्षाचा मुद्दा नाही. यामुळे वाहन नादुरुस्त होत असल्याची तक्रार अनेकांनी केली आहे.