आशियातील खाेल दरी असलेली 'सांदन व्‍हॅली' सातारच्या नारीशक्‍तीकडून सर; मोहिम १२ तासात पूर्ण, साहसी ट्रेकचे कौतुक

४ किलोमीटर खोल दरीत उतरताना महिलांच्या धैर्याची खरी परीक्षा; महिलांच्या आत्मविश्वासापुढे आव्हान फिके

by Team Satara Today | published on : 30 May 2026


सातारा : सातार्‍यातील १० महिलांनी आशिया खंडातील दुसर्‍या क्रमांकाची खोल असलेली 'सांदन व्‍हॅली' (दरी) सर केली. १२ तास दगड, धोंडे, पाणी आणि खोल दरी असा साहसी ट्रेक केलेल्‍या या नारीशक्‍तीचे कौतुक होत आहे.

गुरुवारी सकाळी ७ वाजता निसर्गाच्या रौद्ररूपाशी थेट मुकाबल्‍याला अहिल्‍यानगर जिल्ह्यातील साम्रद गावातून सुरुवात झाली. सूर्यकिरणेही पोहोचू शकणार नाहीत अशा तब्बल ४ किलोमीटर खोल दरीत उतरताना महिलांच्या धैर्याची खरी परीक्षा होती. केवळ अरुंद दऱ्याच नव्हे, तर पुढे प्रचंड मोठ्या दगड धोंड्यांमधून वाट काढावी लागली. सुमारे १२ किलोमीटरचा पायी प्रवास करत या महिलांनी ठाणे जिल्ह्यातील डेहणे गाव गाठले आणि एकच जल्लोष केला. ही मोहिम महिलांनी १२ तासात पूर्ण केली. सांदन व्‍हॅली ही आशिया खंडातील सर्वात खोल दरी आणि ट्रेकर्ससाठी अंतिम परीक्षा मानली जाते. सातारच्या १० महिलांच्या अदम्य साहसाने आणि जिद्दीने ही मोहिम थरारून उठली.

सातारच्या महिलांनी खडतर, निसरड्या आणि अंगावर काटा आणणाऱ्या वाटांवर मात करत हा ऐतिहासिक ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण केला. रनिंग ॲन्ड इंटरटेनमेंट या नावाचा महिलांचा हा ग्रुप आहे. या ट्रेकमध्ये सातार्‍यातील सोनाली खैरमोडे, नेहा गायकवाड, विजया कदम, शशी घोरपडे, भाग्यश्री गायकवाड, सविता गायकवाड, उषा जगदाळे, आशा माने, मनिषा जाधव आणि सुप्रिया मोरे या महिला सहभागी झाल्‍या होत्‍या. हा ट्रेक पूर्ण करण्यासाठी प्रशांत खैरमोडे आणि संजय गायकवाड यांच्यासह इतरांनी मदत केली. 

महिलांच्या आत्मविश्वासापुढे आव्हान फिके

या ट्रेकमधील सर्वात आव्हानात्मक भाग होता 'रॅपलिंग'. अनेक ठिकाणी अतिशय धोकादायक उतारावरून केवळ एका दोराच्या सहाय्याने महिलांनी थेट खोल दरीत झोकून दिले. काही ठिकाणी तर सूर्यप्रकाश नसलेल्या गडद अंधाऱ्या दरीत, छातीभर थंडगार पाण्यातून दोर पकडून पुढे जावे लागत होते. निसर्गाचे हे रूप अवाक करणारे होते, पण महिलांच्या आत्मविश्वासापुढे हे आव्हान फिके पडले. धैर्य, आत्मविश्वास आणि एकजुटीचा विजय झाल्‍याची भावना महिलांनी व्‍यक्‍त केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पोकळ चर्चा नको, थेट लेखी द्या, नाहीतर उद्या उन्हात बाज पडणार; आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा अखेरचा अल्टिमेटम
पुढील बातमी
श्रीक्षेत्र बोरबन येथे हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साहात सुरु; अखंड विठ्ठल नामाचा गजर

संबंधित बातम्या