शिवसैनिकांनी वाचला परिवहन अधिकार्‍यांकडे तक्रारींचा पाढा

अतिजड वाहतुकीकडे लक्ष देण्याची केली मागणी

सातारा : शिवसेना उबाठा गटाच्या वतीने शुक्रवारी सातार्‍याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघोले यांच्याकडे तक्रारींचा पाढा वाचण्यात आला. पुणे-बेंगलोर महामार्गावर अतिजड होणारी वाहतूक, परराज्यातील वाहन चालकांची कागद पत्रांच्या निमित्ताने होणारी अडवणूक यांसह विविध मागण्यांचे निवेदन यावेळी वाघोले यांना सादर करण्यात आले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उपनेते नितीन बानुगडे पाटील, सातारा जिल्हा संपर्क नेते आमदार भास्करजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रादेशिक परिवहन अधिकारी वाघोले यांना निवेदन देऊन प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचारी यांच्या कामकाजाच्या बाबतीत तक्रारीचा पाढा शिवसैनिकांच्या मार्फत वाचण्यात आला. गाड्या पासिंग करताना आवश्यक रक्कमेपेक्षा जास्त रक्कमेची मागणी अधिकारी एजन्ट यांच्या मार्फत केली जाते. कर्मचारी कार्यालयीन वेळ पाळत नाहीत, जबाबदार अधिकारी कार्यालयीन वेळेत उपस्थित नसतात. परराज्यातील खरेदी वाहने वाहन मालकाने कार्यालयाकडून मागितलेली कागदपत्रे जमा करून देखील वाहने रजिस्ट्रेशन होत नाहीत. हा प्रकार फक्त आपल्याच जिल्ह्यात होतो. पूर्वी परिवहन कार्यालयात नागरिकांच्या सुविधांसाठी माहिती केंद्र उपलब्ध होते. ते आत्ता अस्तित्वात नाही. पासिंग, रजिस्ट्रेशन, लायसन्स यासाठी शासनाने निश्चित केलेल्या कालावधीपेक्षा नेहमीच अधिकचा वेळ लागतो. ओव्हरलोडींग चा प्रश्न अंत्यत गंभीर असुन मोठे अपघात आणि रस्त्यांचे प्रचंड नुकसान होत आहे, हे गंभीर मुद्दे यावेळी चर्चेत मांडण्यात आले.

शिवसेना सातारा शहरसंघटक प्रणव वासुदेव सावंत यांनी हे प्रश्‍न समक्ष आणि निवेदनाद्वारे मांडले. यावेळी तालुकाप्रमुख सुनिल पवार, उपजिल्हा संघटक सादिक बागवान, उपतालुकाप्रमुख तानाजी चव्हाण,तालुका संघटक अनिल गुजर, युवासेना उपजिल्हाध्यक्ष महेश शिर्के, उपशहरप्रमुख गणेश अहिवळे, आरोग्य सेनेचे सुमित नाईक, हरिभाऊ पवार, श्रीकांत पवार, रियाज सय्यद आणि शिवसैनिक उपस्थित होते. प्रणव सावंत यांनी लवकरात लवकर निवेदना द्वारे दिलेल्या तक्रारीं वर चौकशी करून कार्यवाही संबंधित अधिकार्‍यांनी केली नाही तर शिवसेना स्टाईल ने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.


मागील बातमी
सातारा नगरपालिकेचा थकबाकीदारांना दणका; वसुलीची मोहिम तीव्र
पुढील बातमी
पुनर्वसनाचे प्रलंबित प्रस्ताव मंत्रालयात पाठवणार

संबंधित बातम्या