सातारा : महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांच्या विशेष मोहिमेत पुणे विभागात सर्वोत्कृष्ट कार्यालय म्हणून भुईंज पोलिस ठाण्याने द्वितीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल सपोनि रमेश गर्जे यांच्यासह टीमचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र शासनाने राज्यभरात शासकीय कार्यालये व त्यांच्या सुविधा यांच्यात सुधारणा होऊन सर्वसामान्य जनतेला गतिमान सुविधा मिळाव्यात यासाठी विशेष मोहीम राबवली होती. या मोहिमेतील दुसऱ्या टप्प्यातील निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये भुईंज पोलिस ठाण्याला पुणे विभागाच्या कार्यक्षेत्रात द्वितीय क्रमांक देण्यात आला. या जाहीर झालेल्या निकलानंतर भुईंजचे प्रभारी अधिकारी रमेश गर्ने व त्यांचे सहकारी अंमलदार, हवालदार, बीट अंमलदार तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखा, वाहतूक शाखा, गोपनीय कक्ष या सर्वांना भुईंज ग्रामस्थांनी व परिसरातील विविध गावांचे सरपंच, पोलिस पाटील विविध पक्षांच्या नेते पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
तसेच भुईंज प्रेस क्लबच्या वतीने संस्थापक जयवंत पिसाळ, अध्यक्ष राहुल तांबोळी, उपाध्यक्ष कृष्णात घाडगे, महेंद्र जाधव, विलास साळुंखे, किशोर रोकडे यांच्यासह सर्व पत्रकारांनी अभिनंदन केले.
दरम्यान, भुईंज पोलिस ठाण्याचा बदललेला चेहरा व परिसर आणि नव्याने बांधलेली तीन सुसज्ज दुय्यम अधिकारी कार्यलये यांचे उद्घाटन लवकरच होणार आहे. त्याची तयारी स्वतः जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख करून घेत असल्याची माहिती सपोनि रमेश गर्जे यांनी दिली.