सातारा : पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटातील धोकादायक एस आकाराच्या वळणावर ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने त्याने सात वाहनांना ठोकारले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेले नाही. मात्र, गाड्यांचे नुकसान झाले आहे. हा अपघात आज रविवारी सायंकाळी उशिरा झाला. या अपघातामुळे पुण्याकडे जाणाऱ्या मार्गीकेवरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली.
याबाबत खंडाळा पोलिसांनी सांगितले की, साताऱ्याहून पुण्याकडे जाणारा ट्रक खंबाटकी बोगद्यातून पुण्याकडे जात असताना एस वळणाच्या अलीकडील तीव्र उतारावर ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यावेळी भरधाव ट्रकने उतारावर एकूण सात गाड्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. ट्रकचालक ट्रकसह पसार झाला. मात्र, पुढे काही अंतरावर जाऊन ट्रकचा रेडिएटर फुटल्याने तो थांबला. पोलिसांनी ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले.
दरम्यान, या अपघातात वाहनांना पाठीमागून ठोकरल्याने सात वाहनांचे नुकसान झाले. महामार्गावरील खंबाटकी बोगद्याच्या पुढील तीव्र उतारावर पाठीमागून जोरदार धडक बसल्याने वाहने अस्ताव्यस्त पडली होती. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. काही वाहनांचे चालक किरकोळ जखमी झाले आहेत. यातील बहुसंख्य वाहने पुणे शहर आणि जिल्ह्यातील आहेत. यामुळे पुणे बाजूकडे जाणारी वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. अस्ताव्यस्त पडलेली वाहने बाजूला केल्यानंतर रात्री वाहतूक सुरळीत झाली. या घटनेची नोंद खंडाळा पोलिसांत सायंकाळी उशिरा झाली आहे. ट्रकचालकाला ट्रकसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.