सातारा : उत्तर प्रदेशातील रामपूर मऊ येथील विकास भारद्वाज (वय अंदाजे ३९) हा तरुण कामाच्या शोधात सातारा येथे आला होता. वैयक्तिक कारणांमुळे त्याने दि. १२ डिसेंबर रोजी आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी १३ डिसेंबर रोजी त्याचे नातेवाईक सातारा येथे पोहोचले. मात्र अचानक घडलेल्या या दु:खद घटनेमुळे आणि आर्थिक व अन्य अडचणींमुळे मृत विकास भारद्वाज यांचे हिंदू धर्माप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यासाठी आवश्यक साहित्य त्यांच्याजवळ उपलब्ध नव्हते.
या परिस्थितीत नातेवाईकांनी सातारा पोलिसांकडे मदतीची विनंती केली. नेहमीप्रमाणे माणुसकीच्या भावनेतून तत्पर असलेल्या सातारा पोलिसांनी खिदमत-ए-खलक या सामाजिक संस्थेशी संपर्क साधला.
संस्थेचे अध्यक्ष सादिकभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष अब्दुल सुतार, आरिफ खान, हाफिज मुराद आसिफ खान, तसेच शाहरुख शेख, मुस्तफा बागवान व इतर स्वयंसेवकांनी पोलिस प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करून माहुली येथील घाटावर विकास भारद्वाज यांचे हिंदू धर्माच्या विधीप्रमाणे अंत्यसंस्कार पूर्णत्वास नेले.
या प्रसंगी मृत विकास भारद्वाज यांचे बंधू विनोद भारद्वाज व अन्य नातेवाईकांनी अश्रूंनी डोळे भरून आपल्या लाडक्या विकासला अखेरचा निरोप दिला. मात्र उत्तर प्रदेशातून साताऱ्यात येऊन भावाच्या मृतदेहावर परधर्मीय स्वयंसेवकांनी अत्यंत आपुलकीने व माणुसकीच्या भावनेतून केलेले हे कार्य पाहून नातेवाईकांचे डोळे पाणावले.
त्यांच्या मुखातून एकच वाक्य भावूकपणे बाहेर पडले- “हमे हमारे प्यारे ने बताकर गया कि इन्सानियत आज भी जिंदा है.” धर्म, भाषा व प्रांत यांच्या पलीकडे जाऊन माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या या घटनेमुळे साताऱ्यात खिदमत-ए-खलक संस्थेच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.