एमपीएससी औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक

by Team Satara Today | published on : 26 August 2026


मुंबई : लोकसेवा आयोगाच्या अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक (गट-ब) परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात गुन्हे शाखेने मोठी धडक कारवाई केली. या प्रकरणी एमपीएससीच्या अप्पर सचिवांसह तीन अधिकारी, क्लास संचालक आणि विद्यार्थ्याच्या नातेवाइकांना अशा एकूण ६ जणांना अटक करण्यात आली. या गैरप्रकारामुळे एमपीएससीने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, सर्व आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान आरोपी विश्वेश्वर दत्तात्रय नकाते (सहाय्यक कक्ष अधिकारी, एम.पी.एस.सी.), अभिजीत गणपतराव लेंडवे (अवर सचिव, एम.पी.एस.सी.), गोपाळ भट्टु मराठे (सहाय्यक कक्ष अधिकारी, एम.पी.एस.सी.), यांच्यासह प्रविण दिलीप पाटील (संचालक कौटील्य अकादमी, नंदुरबार),  अमृत नामदेव पाटील आणि लोकेश उर्फ गौरव राजेंद्र पाटील यांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना आज अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना २ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्यामुळे, आता पोलीस चौकशीत या रॅकेटचे आणखी कोणते धागेदोरे आणि मोठे चेहरे समोर येतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पेपरफुटीचा हा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर एमपीएससीने तातडीने कठोर निर्णय घेत औषध निरीक्षक (गट-ब) परीक्षा रद्द केली. या निर्णयामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या परीक्षार्थींना अंशतः दिलासा मिळाला आहे. सरकारने परीक्षा रद्द केली असली तरी, या संपूर्ण घोटाळ्यामागचा मुख्य आरोपी कोण आहे? याची पाळेमुळे शोधून काढण्याची मागणी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली आहे. एमपीएससीच्या अधिकाऱ्यांचा यात थेट सहभाग आढळल्याने या प्रकरणाचा सूत्रधार शोधून त्याच्याकडून सत्य समोर आणले पाहिजे, अशीही विद्यार्थ्यांकडून मागणी केली जात आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात अंत्योदय कार्डवरील साखरेची खासगी दुकानात विक्री; दुकान संचालिकेवर शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा, २०७ किलो साखर जप्त
पुढील बातमी
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधीचे फडणवीस यांना पत्र; आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी भेट घेऊन त्यांच्या मागण्या ऐका

संबंधित बातम्या