कोरेगाव : तालुक्याच्या पूर्व भागातील किल्ले वर्धनगडाच्या पायथ्याशी असलेल्या रामोशीवाडी गावच्या हद्दीत शनिवारी दुपारी वीज अंगावर कोसळल्याने शेतकरी दादा चिलबा बुधावले (वय ५२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे रामोशीवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रामोशीवाडी येथील घोडमुख शिवारात शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास दादा बुधावले हे बकरी चारण्यासाठी गेले होते. त्यावेळी अचानक जोरदार वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला. बकरी काही अंतरावर सोडून पावसापासून बचाव करण्यासाठी बुधावले बाजूला थांबले असता अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने काही अंतरावर असलेल्या बकऱ्या मात्र बचावल्या.
घटनेची माहिती मिळताच सातारा जिल्हा बँकेचे माजी संचालक तानाजीराव मदने तसेच बाजार समितीचे उपसभापती व सरपंच केशव मदने यांनी तातडीने हालचाल करत ग्रामस्थ व युवकांसह घटनास्थळी धाव घेतली. बुधावले यांच्या निधनाबद्दल ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.
याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून हवालदार विक्रांत लावंड पुढील तपास करत आहेत.