26 ऑक्टोबरपासून कास तलावात बोटिंग सुरू

कास बोटिंगमध्ये स्थानिकांना संधी द्या

by Team Satara Today | published on : 17 October 2025


बामणोली : सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कास तलावात आता 26 ऑक्टोबरपासून बोटिंग सुरू होणार आहे. त्यामुळे पर्यटकांना आता कास तलावामध्ये पर्यावरण पूरक बोटिंगचा आनंद लुटता येणार असून साताऱ्याच्या पर्यटनात आणखी भर पडणार आहे. दरम्यान, या बोटिंगमध्ये स्थानिक युवक व नागरिकांना रोजगाराची संधी द्या, अशी मागणी होवू लागली आहे. 

खा.उदयनराजे भोसले यांनी ज्या ज्या वेळी कासला भेट दिली त्या त्या वेळी कास तलाव भिंतीवर विद्युत रोषणाईसह बोटिंग सुरू करणार असल्याचे अधोरेखित केले होते. त्याचे आता सत्यात रुपांतर होत असून याच दीपावलीमध्ये कास तलावामध्ये उद्घाटन होणार असून इलेक्ट्रिक व सौर ऊर्जेवरील बोटिंगला सुरुवात होणार आहे. यासाठी कास धरणाच्या भिंती जवळ सर्वे नंबर 124 मध्ये थ्री फेज लाईटसाठी मागणी केल्याचे समोर येत आहे. बोटी देखील खरेदी केल्याची माहिती मिळत आहे.

खा.उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले या दोन्ही नेत्यांच्या प्रयत्नाने कास तलाव पर्यटकांचे आकर्षण होवू लागला आहे. सुरू होत असलेल्या बोटिंगमधून सातारा नगरपालिकेला कर रूपाने महसूल देखील जमा होणार आहे. बोटिंगचा ठेका सातारा नगरपालिकेने सातारा शहरातील एका कंपनीला दिला असून ही कंपनी व सातारा नगरपालिका यांच्यामध्ये दहा वर्षाचा करार देखील झाला आहे. ज्या कंपनीला ठेका दिला आहे त्या कंपनीकडून सातारा नगरपालिकेला लाखो रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या निधीमध्ये दर तीन वर्षांनी दहा टक्के वाढ करण्यात येईल, असे देखील करारात म्हटले आहे. नगरपालिकेने ज्या कंपनीला बोटिंगचा ठेका दिला आहे त्यांना पाणी दूषित होणार नाही व पर्यावरण दृष्टीने पर्यावरण सुरक्षित राहील यासाठी काही अटी शर्ती देखिल घालण्यात आल्या आहेत.

कास तलावात बोटिंग सुरू होणार असल्याची माहिती कास गावातील स्थानिक ग्रामस्थ दत्तात्रय किर्दत यांना मिळाल्यावर त्यांनी सातारा नगरपालिकेतील अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र ज्या कंपनीला बोटिंगचा ठेका देऊन करार करण्यात आला आहे त्या करारावर सातारा नगरपालिकेतील पाणीपुरवठा अभियंता, लेखापाल, नगरअभियंता, तसेच मुख्याधिकारी यांच्या सह्या आहेत. मग संबंधित अधिकारी यांच्यावर माहिती न देण्यासाठी कोणाचा दबाव आहे का? हा देखील संशोधनाचा भाग आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आपला पैसा आपला अधिकार योजनेचा लाभ घ्यावा : अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने
पुढील बातमी
सी.एल.एम.सी मिल्क बँकेचा शुभारंभ

संबंधित बातम्या