९९ व्या साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाचे मंगळवारी लोकार्पण; साहित्य संमेलनाच्या कार्यालयात आयोजन

by Team Satara Today | published on : 15 December 2025


पुणे : मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासासह साताऱ्यातील वीर पुत्रांची ओळख करून देणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या सातारा येथे आयोजित ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाचा शुभारंभ मंगळवारी होत आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशनतर्फे दि. १ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत ९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथील शाहू स्टेडियममध्ये होणार आहे. या संमेलनाच्या संकेतस्थळाचा लोकार्पण समारंभ श्री. छ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते मंगळवार, दि. १६ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५:३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम जनता सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात असलेल्या साहित्य संमेलनाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी आणि कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.

संकेतस्थळाविषयी..

छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा जपत छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांनी निर्मिलेल्या स्वराज्याच्या राजधानीत; अर्थात साताऱ्यात ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी मातीत होत असलेले हे पहिलेच साहित्य संमेलन आहे. ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सातारा नगरी सज्ज होत असून ही साहित्यनगरी सारस्वत आणि साहित्य रसिकांच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. ९९व्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सातारा जिल्ह्याची भौगोलिक माहिती, जिल्ह्यातील वीर पुत्रांची ओळख, साताऱ्याच्या मातीत जन्मलेले आणि आपल्या कर्तृत्वाने जिल्ह्याचे नाव उज्वल करणारे कर्तृत्ववान यांसह  संमेलनाचे वैशिष्ट्य दर्शविणारी माहिती, आकर्षक मुखपृष्ठासह संमेलनाच्या संकेतस्थळाद्वारे उपलब्ध होत आहे. यात साहित्य संमेलनाचे वेळापत्रक, संमेलनस्थळ, स्वागत समिती, आमंत्रित पाहुणे, उद्‌घाटन समारंभ यांसह संमेलनादरम्यान होत असलेला माय मराठीचा जागर आणि या संपूर्ण उपक्रमासाठी अविरतपणे कार्यरत असलेल्या स्वागताध्यक्षांसह पदाधिकारी आदींचे परिचय  करून देण्यात आला आहे. समाजमाध्यमांत संमेलनाविषयीची वृत्ते, छायाचित्रे, चित्रफिती यांसह ताज्या घडामोडींविषयी संकेतस्थळावर सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सेवागिरी यात्रेनिमित्त पुसेगाव येथे कुस्त्यांचा महासंग्राम
पुढील बातमी
राजापूरमध्ये उभा राहणार 13 एकर जागेत वसुंधरा वनराई प्रकल्प

संबंधित बातम्या