माऊलींच्या पालखीसाठी सातारा पोलिसांचे कडेकोट सुरक्षा कवच; चोख बंदोबस्तासह २४ सराईत गुन्हेगार तडीपार

by Team Satara Today | published on : 13 July 2026


सातारा : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर, जगद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज (माऊली) यांच्या पालखीचे १५ जुलै रोजी सातारा जिल्ह्यात आगमन होत आहे. हा पालखी सोहळा जिल्ह्यात पूर्णपणे निर्विघ्न, सुरक्षित आणि शांततेत पार पडावा, तसेच वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी सातारा पोलीस प्रशासनाने अत्यंत चोख आणि कडक बंदोबस्त तैनात केला आहे. माऊलींची पालखी १५ ते १८ जुलै दरम्यान सातारा जिल्ह्यात मुक्कामी असणार असून, त्यानंतर ती सोलापूर जिल्ह्याकडे मार्गस्थ होईल. या संपूर्ण कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि समाजकंटकांवर वचक ठेवण्यासाठी पोलिसांनी व्यापक नियोजन केले आहे.

​पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी आधीच प्रतिबंधात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सोहळ्यात अडथळा ठरू शकणाऱ्या २४ सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले असून, आणखी १६ जणांच्या तडीपारीचे प्रस्ताव सध्या विचाराधीन आहेत. पालखी मार्ग, मुक्कामाची ठिकाणे आणि गर्दीच्या ठिकाणी चोऱ्यामाऱ्या रोखण्यासाठी तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी साध्या वेशातील पोलिसांची विशेष शोध पथके (DB) २४ तास तैनात असणार आहेत.

​वारकऱ्यांच्या सेवेसाठी आणि चोख सुरक्षेसाठी सातारा जिल्हा पोलीस दलाने मोठा फौजफाटा मैदानात उतरवला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील उपअधीक्षक ते फौजदार दर्जाचे ६३ अधिकारी, ७३९ पुरुष पोलीस अंमलदार, ९७ महिला पोलीस अंमलदार, ११०० पुरुष होमगार्ड, २०० महिला होमगार्ड, ७५ वाहतूक नियंत्रण पोलीस, आरसीपीच्या २ प्लाटून आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाचा (BDDS) समावेश आहे. पालखी सोहळ्याची भव्यता आणि गर्दी लक्षात घेता जिल्ह्याबाहेरूनही अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. यामध्ये बाहेरील १८ अधिकारी, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून प्रत्येकी १४० अंमलदार, रायगडचे १० अंमलदार, ३० अतिरिक्त वाहतूक अंमलदार आणि एसआरपीएफची (SRPF) एक कंपनी बंदोबस्तासाठी दाखल झाली आहे.

​सदर पालखी सोहळ्याचे संपूर्ण नियोजन कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली, सातारा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या थेट नियंत्रणात केले जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बंदोबस्तात तैनात असलेल्या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांना कडक कायदेशीर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. पालखी सोहळ्याच्या गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या व पाकीटमारी करणाऱ्यांवर विशेष नजर ठेवली जाणार आहे. तसेच महिलांची छेडछाड किंवा गैरवर्तन करणाऱ्यांविरुद्ध आणि गर्दीच्या ठिकाणी बेजबाबदारपणे वाहने चालवून वारकऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण करणाऱ्या वाहनचालकांवर तत्काळ कठोर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्याकडे मार्गस्थ होईपर्यंत संशयित आणि समाजकंटकांवर कायद्याचा कडक बडगा उगारला जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. सातारा पोलीस वारकऱ्यांच्या सेवेसाठी तत्पर असून, नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा आणि पालखी सोहळा आनंदात व शिस्तीत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महामार्गावरील शेंद्रे उड्डाणपुलावर सीएनजी वाहतूक करणाऱ्या टँकरमधून गॅस गळती; पोलिसांकडून तातडीने उपाययोजना
पुढील बातमी
शेअर बाजारातील गुंतवणुकीवर मासिक परताव्याच्या आमिषाने निवृत्त जवानाची साडेचार लाखांची फसवणूक

संबंधित बातम्या