सातारा : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फलटण शहराध्यक्षपदी अमीर शेख यांची नियुक्ती करण्यात आली असून पक्षाचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांना त्यांच्या नियुक्तीचे पत्र प्रदान केले.
गेली पंचवीस वर्षे आमिर शेख फलटण शहरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी फलटण काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून काम केले असून त्यांनी फलटण शहरातील अवैध खाजगी सावकारीवर आवाज उठवला होता. त्यांच्या कामगिरीमुळे फलटण तालुक्यातील अवैध खाजगी सावकारीचा बिमोड करणे शक्य झाले. सध्या ते फलटण पालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत असे असताना त्यांनी आज शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गटाचे तालुकाध्यक्ष धर्मराज पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांचे चिरंजीव साहिल शिंदे, मधुकर रणदिवे, मधुकर रणदिवे, पत्रकार सचिन ठणके –पाटील आदी उपस्थित होते.
युवक संघटना आणि पक्ष विस्ताराला प्राधान्य देणार : अमीर शेख
या नियुक्तीनंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना अमीर शेख म्हणाले, सातारा जिल्ह्याच्या विकासात शरदचंद्र पवार यांचे फार मोठे योगदान आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्याच नेतृत्वाखाली सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असे. भविष्यात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष, आ. शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण तालुक्यात युवक संघटना बांधणीसह पक्ष विस्ताराला प्राधान्य देणार असून भविष्यात येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीसाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताकतीने सामोरा जाईल.