साहित्य संमेलने ही राष्ट्राचा मार्ग उन्नत करण्यासाठी असतात- साहित्यिक प्रा. शरणकुमार लिंबाळे यांच्या हस्ते साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ

by Team Satara Today | published on : 16 December 2025


सातारा  : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांना तीन शतकांची परंपरा आहे. साहित्य संमेलने ही लोकहितवादी व न्यायमूर्ती रानडे यांच्या आग्रहाने सुरू झाली. ही साहित्य संमेलने वाचकांचा मेळा लेखकांचा मेळा पुस्तकांचा मेळा असतात. लेखकांच्या विचारांचे प्रतिबिंब या साहित्य संमेलनामध्ये उमटते. या माध्यमातून समाजाचा आणि राष्ट्रबांधणीचा मार्ग उन्नत होत असतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. शरणकुमार लिंबाळे यांनी केले.

येथील छत्रपती शाहू स्टेडियम मध्ये 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ स्वागताध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत लिंबाळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी,कार्यवाह सुनीताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, मसाप शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, मावळा फाउंडेशनचे अध्यक्ष ऍड. बेबले, वजीर नदाफ,जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष अमोल मोहिते उपस्थित होते.

मंडप उभारणीच्या औपचारिक कार्यक्रमानंतर रसिकांशी संवाद साधताना ते म्हणाले, माझ्यासारख्या सामान्य माणसाचा तुम्ही कधी पेढे देऊन सत्कार केला ही माझ्यासाठी अत्यंत आयुष्यातील मोठी गोष्ट आहे. 1878 साली समाज परिवर्तनाच्या चळवळीसाठी लोकहितवादी व न्यायमूर्ती गोविंद रानडे यांच्या प्रयत्नातून ही साहित्य संमेलने सुरू झाली. या संमेलनांना तीन शतकांचा इतिहास आहे ही संमेलने आता शंभराव्या संमेलनाकडे निघाली आहेत. समाज सुधारण्याच्या प्रेरणे साहित्य संमेलनाची सुरुवात झाली. 

संमेलनाचा हा मंडप सातारकरांच्या मायेचा पदर

समाज व साहित्य एकत्र यायला पाहिजे लेखक व लोक यांचं नातं घट्ट असलं पाहिजे. लेखक हा खोलीत बसून लिहितो मात्र वाचकांना काय वाटतं याचा आरसा साहित्य संमेलनामध्ये पाहायला मिळतो .साहित्य संमेलने ही वाचकांसाठी व लेखकांसाठी असतात तो एक सांस्कृतिक मेळा आहे. साताऱ्यात साहित्य संमेलनाचा हा मंडप,  मंडप नसून सातारकरांच्या मायेचा पदर आहे. आपण शस्त्रांवर विश्वास ठेवत नाही पुस्तकांवर विश्वास ठेवतो. समाजाला मोठं करण्यासाठी आपण लिहितो आणि राष्ट्राला सुंदर करण्याचा प्रयत्न या साहित्य निर्मितीमधून होत असतो .समाज निर्मितीसह राष्ट्र उन्नत करण्यासाठी ही साहित्य संमेलने असतात असे प्रतिपादन त्यांनी केले.


संमेलनाच्या यशस्वीतेसाठी योगदान द्यावे : मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, मंडप उभारणीचा शुभारंभ ज्येष्ठ साहित्यिक शरद कुमार लिंबाळे यांच्या हस्ते झाला म्हणजेच साहित्य संमेलनाला एक वेगळी किनार लाभली आहे. शतकपूर्ती संमेलना पूर्वीचे 99 साहित्य संमेलन म्हणून साताऱ्याच्या या संमेलनाची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे. या संमेलनाचा साचेबद्धपणा मोडून वेगळ्या पद्धतीने साहित्य केंद्री कार्यक्रम आणि नेटक्या नियोजनासाठी आपण सर्वांना एकत्र घेऊन काम करत आहोत .सर्व सातारकरांनी आपापल्या पद्धतीने या साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी योगदान द्यावे, असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे यांनी केले. संपूर्ण भारतातून या संमेलनाला भेट देण्यासाठी लोक येणार आहेत .नगरपालिकेच्या राजकीय रणधुमाळीमुळे फारसा वेळ देता आला नाही मात्र संयोजन समितीचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या सूचनाप्रमाणेअडचणीच्या संदर्भाने आमची सातत्याने चर्चा असायची .संमेलनापूर्वी वातावरण निर्मिती करण्यासाठी आपल्याला मोठी तयारी करायची आहे आपल्याकडे दिवस कमी आहेत या कमी दिवसांमध्ये सुंदर आणि चांगलं नियोजन आपल्याला या संमेलनाचे जे आहे ते यशस्वी करण्यासाठी करायचे आणि नक्कीच त्याप्रमाणे आपण काम करू मिलिंद जोशी सरांना मी शंभर टक्के सांगतो की आपण ज्या अपेक्षेने आमच्यावर ही जबाबदारी दिली आहे ती अपेक्षा सातारकर म्हणून आम्ही नक्कीच पूर्ण करू .राज्य शासन म्हणून आपल्याला मर्यादित स्वरूपात निधी मिळणार आहे बाकीच्या निधीचे संकलन आणि त्याची उभारणी ही आपल्यालाच करावयाची आहे त्या दृष्टीने सुद्धा सातारकारांनी आपापल्या पद्धतीने योगदान द्यावे, असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे यांनी केले.

जिथे पुणेकर थांबतात तिथून पुढे सातारकर सुरू होतात

मिलिंद जोशी म्हणाले,  सातारकर कंदी देऊन संधी घेत असतात. मात्र मावळा फाउंडेशन आणि शाहूपुरी शाखा सातारा यांच्या या साहित्य संमेलनाच्या मागणी मागे बारा वर्षाचा मोठा इतिहास आहे. प्राध्यापक शरणकुमार लिंबाळे यांनी त्यांच्या साहित्य निर्मितीमधून विद्रोहाचे रूपांतर विद्वेषामध्ये होऊ दिलं नाही. त्यामुळे त्यांच्या लेखनामध्ये एक वैचारिक बैठक आढळून येते. महामंडळाच्या सर्व सदस्यांना येथे जास्तीत जास्त काम करण्याची संधी आहे सातारकरांनी जास्त काम येथे केल्यानंतर पुण्यातील आगामी संमेलनासाठी सुद्धा आम्हाला जास्त कष्ट करावे लागतील या दृष्टीने साताऱ्याची ही संमेलन लक्षवेधी आहे. जिथे पुणेकर थांबतात तिथून पुढे सातारकर सुरू होतात, असे मिश्किलपणे म्हणत मिलिंद जोशी म्हणाले, साहित्य संमेलने ही राजकारणी व साहित्यिक ही आपापल्या मर्यादित राहिल्यावर यशस्वी होतात .ते पुढे म्हणाले 98 वे मराठी साहित्य संमेलन यमुने काठी झाले आता 99 साहित्य संमेलन कृष्णाकाठी होत आहे .मी तर कृष्णा कोयनेचं पाणी पिलेलो माणूस आहे त्यामुळेच मी मुळाकाठी चांगल्या पद्धतीने तग धरून आहे त्यामुळे आगामी साहित्य संमेलनाचा मी कोणताही ताण घेत नाही अशी कोटी त्यांनी केली. 

मावळा प्रतिष्ठान व मसाप शाहूपुरी शाखा सातारा यांचे वतीनेउपस्थित सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ आणि कंदी पेढे देऊन स्वागत करण्यात आले .मसाला शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. साहित्य महामंडळाच्या तसेच संयोजन समितीच्या कार्यवाह सुनीताराजे पवार यांनी सुद्धा यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विधानसभेत सत्ताधारी-विरोधी आमदारांकडून ना. मकरंद पाटलांचे कौतुक; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत केलेल्या मदतीची दखल
पुढील बातमी
मतमोजणीच्या ठिकाणी एक किलोमीटर परिघांमध्ये येणाऱ्या सर्व नेट सर्वरला इंटरनेट जामर लावण्याची अपक्ष उमेदवारांची मागणी; निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे निवेदन

संबंधित बातम्या