सातारा : सामान्यातील सामान्य माणसाला शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, हाच छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचा मुख्य उद्देश आहे. लोकांच्या समस्या जागेवरच सोडवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान' अंतर्गत राज्यभरात मंडल स्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे . पाटण तालुक्यातील तळमावले मंडल येथे भव्य 'समाधान शिबिराचे' आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.या शिबिरात शेकडो नागरिकांच्या प्रलंबित महसूल कामांचा तात्काळ निपटारा करण्यात आला असून, शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या हाती सुपूर्द करण्यात आला.
यावेळी उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे, पाटणचे तहसीलदार अनंत गुरव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पंचायत समिती सदस्य सचिन यादव, पंचायत समिती सदस्य पंजाबराव देशमुख, उपसभापती, बाजार समिती पाटण विलास गोडांबे, सरपंच, माण्याची वाडी रवींद्र माने, कविता कचरे,गणेश यादव, यांसह इतर मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या समाधान शिबिरामध्ये प्रशासनाने एकाच छताखाली अनेक क्लिष्ट प्रक्रिया पूर्ण करून नागरिकांना दिलासा दिला. प्रामुख्याने महसूल दुरुस्ती: कलम १५५ अंतर्गत ७/१२ दुरुस्ती, प्रलंबित व नवीन वारस नोंदी, आणि राजपत्राद्वारे उताऱ्यावरील नावातील बदल. तांत्रिक शेरे हटवणे: ७/१२ उताऱ्यावरील 'अ.पा.क.' शेरा कमी करणे आणि 'ए.कु.म्या.' शेरा कमी करण्याची प्रक्रिया पार पडली. जमीन सुधारणा: भोगवटदार वर्ग-२ चे वर्ग-१ मध्ये रूपांतर करणे आणि लक्ष्मी मुक्ती योजनेतंर्गत कार्यवाही, शालेय विद्यार्थ्यांच्या विविध दाखल्यांचे वाटप, आग्रिस्टाक योजना आणि सामाजिक अर्थसाह्य योजनेतील लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
रस्ते नकाशा: विशेषतः ग्रामीण भागातील पानंद रस्ता नोंद केलेल्या नकाशांचे वाटप करून शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न मार्गी लावला. तळमावले महसूल मंडळातील गावांमधील नागरिकांनी या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले फेरफार निर्गत झाल्याने शेतकऱ्यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.