कराड : सार्वजनिक गणेश मंडळांच्या सहा फुटापासून सुमारे तीस फुटाच्या जवळपास २०० हून अधिक गणेश मुर्ती पाण्यात भिजून वाहून जाण्याची शक्यता होती. त्यातून मोठ्या नुकसानीसह संकट कराडवर ओढवणार होते. कराडातील सर्व जाती धर्माच्या युवकांना कुंभार समाजातील कारगिरांसाठी धो-धो पावसात आठ तास मदत कार्य राबवत १५ फुटापेक्षा मोठ्या सुमारे २०० हून अधिक गणेश मुर्ती सुरक्षीत स्थळी हलविल्या.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून भर पावसात हिंदू-मुस्लीम समाजातील सुमारे १५० हून अधिक युवक, २० हून अधिक ट्रक्टर चालक, मालक कुंभार समाजाच्या मदतीला धावले. धो धो पावसात सायंकाळी पाच पासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत अखंडीत मदत कार्यात तीस फुट उंचीपासून मोठ्या, लहान ३०० हून अधिक मुर्ती सुरक्षीत हलवल्या. भर पावसात कराडातील युवकांच्या माणुसकीने जाती, धर्माच्या आणि व्देषाच्या भितींही निश्चीत वाहून गेल्या. ऐन संकटातच एकमेकांच्या मदतीला धावलेल्या युवकांत दिसली ती, केवळ माणुसकीची सांधणारी भिंतच.
कोरोनानंतर कराडला महापुराच्या निमित्ताने गणपती बाप्पाला सुरक्षीत ठेवण्यासाठी जाती, धर्म विसरून काल आलेल्या ऐक्याने पुन्हा एकदा सामाजिक सलोखा सिध्द केला. प्रशासनाने येथे हातवर केले तेथेच सर्व जाती-धर्मातील शेकडो युवकांनी एकमेकांच्या हातात हात घालून केलेल्या मदतीने कमाल केली. त्यामुळे लाखो रूपयांचे नुकसान तर वाचलेच, त्याशिवाय गणेशोत्सावरील मोठे संकाटही टळल्याचे वास्तव कराडकरांसमोर आले. त्याची शहरात जोरदार चर्चा आहे.
पावसाच्या संततधारेसहीत कोयना धरणातून पाणी सोडल्याने कृष्णा व कोयना नद्यांच्या काठावर सतर्कतेचा इशारा दिला आहे. दिवसभर पावसाने शहरात दुपानंतर स्थिती बिकट होती. कृष्णा-कोयना नद्याच्या पाणी पातळीत वाढ होत होती. त्यामुळे गंभीर स्थिती होती. कराडातील ३०० हून अधिक सार्वजनिक गणेश मंडळांच्या मुर्ती बनविण्यासाठी कोयनेकाठी बालाजी मंदीरासमोर मोकळ्या मैदानात पालिकेने जागा दिली आहे. तेथे जवळसास १५० अधिक कारागिर चार महिन्यांपासून सहापासून तीस फुटापर्यंतच्या मुर्ती घडवत आहेत. त्या मुर्तींना पुराचा धोका निर्माण झाला होता. काल दुपारी तो वाढलाच त्यामुळे कारागिरांनी मदतीची हाक सामाजिक माध्यमांसहीत मोबाईलवरून शहरातील वेगवेगळ्या ग्रुपसहीत सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना दिली.