कराड : आजीकडे राहायला असलेल्या अल्पवयीन नातीचा विनयभंग केल्याप्रकरणी चुलत आजोबाला तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा कराड येथील पोक्सो न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश यू. एल. जोशी यांनी शुक्रवारी सुनावली.
याबाबत माहिती अशी, सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील फिर्यादीची मुलगी शिक्षणासाठी कराड तालुक्यातील एका गावात आजीकडे राहत होती. अल्पवयीन पीडित मुलगी 28 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री आजीसोबत झोपली असताना, चुलत आजोबाने तिचे अंथरुण ओढून विनयभंग केला. त्यामुळे पीडित मुलगी दचकून उठली. ही घटना कुटुंबीयांना समजल्यानंतर पीडित मुलीच्या आईला बोलावून घेण्यात आले. मुलीच्या आईने कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
तत्कालीन सपोनि सरोजिनी पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास करून, विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी न्यायाधीश जोशी यांच्यासमोर झाली. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता राजेंद्र सी. शहा, अॅड. पुष्पा जाधव यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले. पीडित मुलगी, तिची आई, तपासी अधिकारी सरोजिनी पाटील यांच्या साक्षी, पुरावा आणि अॅड. पुष्पा जाधव यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून, न्यायालयाने आरोपीला पोक्सो कायद्यान्वये तीन वर्षे सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.