कारच्या धडकेत चिमुकल्‍याचा मृत्‍यू; वाढे येथील घटना, सीसीटीव्‍हीमुळे अपघाताची घटना समोर

संशयित कार चालकाविरुद्ध सातारा तालुका पाेलिस ठाण्यात गुन्‍हा

by Team Satara Today | published on : 14 August 2026


सातारा : वाढे, (ता. सातारा) येथे कारच्या धडकेत शिवार्थ मनोज नलावडे (रा. वाढे) या अवघ्या सव्‍वा वर्षाच्या चिमुकल्‍याचा मृत्‍यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्‍यक्‍त होत असून, संशयित कार चालकाविरुद्ध सातारा तालुका पाेलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाला आहे. दरम्‍यान, सीसीटीव्‍हीमुळे अपघाताची घटना समोर आली.

रोहित सतीश नलावडे (वय २७, रा. वाढे) याच्याविरुद्ध गुन्‍हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिस रामचंद्र गोरे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. १० ऑगस्‍ट रोजी सकाळी घडली आहे. कारचालक रोहित नलावडे हा एमएच ११ डीझेड २९०१ या क्रमांकाची हॅरीअर कार चालवत होता. रस्‍ता अरुंद असतानाही बेदरकार, निष्‍काळजीपणे कार चालवत असताना लहान मुलगा शिवार्थ याला धडक बसली. या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला. जखमी अवस्‍थेत मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, मुलाचा मृत्‍यू झाला.

अवघ्या सव्‍वा वर्षाच्या मुलाचा मृत्‍यू झाल्‍याने नलावडे कुटुंबीयांवर दु:खाचा डाेंगर कोसळला. सातारा तालुका पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्‍यानंतर त्‍यांनी घटनास्‍थळी धाव घेतली. परिसरातील सर्व प्राथमिक माहिती घेतली. त्‍यानुसार पोलिसांनी स्‍वत:हून याप्रकरणी कार चालकाविरुद्ध गुन्‍हा दाखल केला.

अपघातावेळी नेमके काय झाले? हे लक्षात आले नाही. त्‍यावेळी कार तेथेच होती. मुलगा जखमी झाल्‍याने त्‍याच कारमधून मुलाला रुग्णालयात नेले. सातारा तालुका पोलिसांना घटना समजल्‍यानंतर त्‍यांनी घटनास्‍थळी धाव घेऊन मुलाच्या कुटुुंबीयांशी प्राथमिक चर्चा केली. कारवर कुटुंबीयांनी संशय व्यक्‍त केला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कंत्राटदारांच्‍या कामगिरीला मूल्‍यांकनाद्वारे रेटिंग : मंत्री शिवेंद्रराजे भोसले, अधिक खर्चाच्या आगामी प्रकल्पांना ही कार्यपद्धती लागू राहणार
पुढील बातमी
दरडग्रस्त व पूरग्रस्त गावांच्या पुनर्वसनासाठी धारित धोरण लवकरच तयार करण्यात येणार - मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील

संबंधित बातम्या