खासदारांसमोर वाठार ग्रामस्थांनी रेल्वे समस्यांचा वाचला पाढा

by Team Satara Today | published on : 29 August 2024


वाठार : अनेक वर्षांपासून वाठार स्टेशन स्थानकांचा विकास प्रलंबित असून, प्रवाशांची गैरसोय होत आहे, तसेच रेल्वे गेटवर तोडगा काढण्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. या वेळी ग्रामस्थांनी रेल्वे समस्यांचा पाढा वाचला.

वाठार स्टेशन येथे रेल्वेच्या समस्यांची आढावा बैठक घेतली. या वेळी आमदार दीपक चव्हाण, रेल्वे विकास अधिकारी विकासकुमार श्रीवास्तव, सरपंच नीता माने, नागेश जाधव, पंचायत समितीचे माजी सदस्य संजय माने व ग्रामस्थ उपस्थित होते.

नागेश जाधव म्हणाले, ‘‘रेल्वेने केलेली कामे निकृष्ट पद्धतीची असल्याने यामध्ये नागरिकांची व वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. रेल्वेने दुहेरीकरण करताना वाठार स्टेशनमधील गेट नंबर ४५ बंद केले. जुन्या रेल्वे गेटच्या ठिकाणी पादचारी भुयारी मार्ग काढला. त्या मार्गात पावसाळ्यात पाणी साठून राहते, भुयारी मार्गात लाइटची सोय नाही, चिखलामुळे अपघातांची संख्या वाढली आहे.

रेल्वेने वाहतुकीसाठी पर्यायी केलेल्या बोगद्यामध्ये बोगदा अरुंद असल्याने त्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे, रेल्वेचे दुहेरीकरण करताना शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या मात्र शेतकऱ्यांना रानात येणे जाण्यासाठीचे रस्त्याची गैरसोय केली, देऊर येथील गेट नंबर ४७ मध्ये रेल्वे फाटक अरुंद असल्याने त्या ठिकाणी कायमच वाहतुकीची कोंडी होत आहे, आशा अनेक गैरसोयींबाबत वारंवार पाठपुरावा करून सुद्धा गैरसोयी दूर होत नाही.

या वेळी ग्रामस्थांच्या रेल्वेकडून होणाऱ्या गैरसोयी ऐकून खासदार मोहिते-पाटील यांनी नाराजी व्यक्त केली, तसेच समस्येचे निवारण करावे, अशा सूचना केल्या. दरम्यान रेल्वे अधिकाऱ्यांनी अधिकारात असलेली कामे महिनाभरात पूर्ण करू, असे सांगितले. यावेळी संजय माने, माजी सरपंच केशवराव भोईटे, माजी सरपंच ऋषिसेन जाधव, माजी उपसरपंच संजय भोईटे, इरफान पठाण व ग्रामस्थ उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
संभाजीनगर येथे धार्मिक, शैक्षणिक स्थळांसाठी डस्टबिनचे वाटप
पुढील बातमी
जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेचा भव्य एक्स्पो येत्या शुक्रवारी व शनिवारी

संबंधित बातम्या