सातारा : साताऱ्याच्या ऐतिहासिक भूमीत आज भावनांचा एक हळवा क्षण अनुभवायला मिळाला. कोडोली येथील छत्रपती प्रतापसिंह महाराज आयुर्वेदिक उद्यानात श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या शिल्पास पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी खासदार उदयनराजे भोसले स्वतः उपस्थित होते.
शिल्पासमोर उभे राहून वडिलांच्या स्मृतींना नमन करताना त्यांच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले. काही क्षण ते निःशब्द उभे राहिले. त्या क्षणी एक खासदार नव्हे, तर आपल्या वडिलांची आठवण काढणारा मुलगा दिसत होता.या वेळी सातारा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष, नगरसेवक आणि स्थानिक मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण वातावरणात एक भावूक शांतता पसरली. प्रतापसिंह महाराजांची परंपरा, त्यांचा वारसा आणि त्यांची शिकवण पुढे नेण्याचा निर्धार करत उदयनराजेंनी वडिलांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.