फलटण : महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे दिल्या जाणार्या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. सातारा येथील ज्येष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण, राजीव साबडे (पुणे), शंतनू डोईफोडे (नांदेड), बसवेश्वर चेणगे (मसूर), प्रकाश कुलथे (श्रीरामपूर), विजय पालकर (माणगाव), श्रीराम जोशी (अहिल्यानगर), डॉ. अनिल काळबांडे (यवतमाळ), आशिष कदम (कोल्हापूर) हे या पुरस्काराचे मानकरी आहेत. पुरस्कार वितरण 6 जानेवारी 2026 रोजी मराठी पत्रकारदिनी, ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी पोंभुर्ले (ता. देवगड, जि. सिंधुदुग) येथे होणार असल्याची माहिती महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक-अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी दिली.
वृत्तपत्र क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या पत्रकारांना मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दरवर्षी पत्रकार कल्याण निधीतर्फे दर्पण पुरस्कारांनी गौरवण्यात येते. यावर्षीच्या पुरस्काराची घोषणा बेडकिहाळ यांनी रविवारी केली. रोख रक्कम, शाल, पुष्पगुच्छ, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा चरित्र ग्रंथ व सन्मानचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
दरम्यान, या वर्षापासून विशेष बाब म्हणून राज्यातील माहिती व जनसंपर्क विभागातील उत्कृष्ट शासकीय व अन्य क्षेत्रातील प्रभावी वृत्तांकन करणार्या एका अधिकार्याला ‘दर्पण’ पुरस्कार देण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. त्यानुसार पहिलाच ‘दर्पण’ पुरस्कार पुणे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांना देण्यात येणार आहे. पत्रकार कल्याण निधीचे उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव, कृष्णा शेवडीकर, कार्यकारी विश्वस्त विजय मांडके यांनी या पुरस्कारप्राप्त पत्रकारांचे अभिनंदन केले.